आसनसोल: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 71 जागांवर मतदान सुरू आहे. देशभरातल्या बहुतांश ठिकाणी मतदान सुरळीतपणे सुरू असताना पश्चिम बंगालमध्ये अनुचित प्रकार घडला. पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंच्या कारवर स्थानिकांनी हल्ला केला. यानंतर आसनसोलमधल्या जेमुआ मतदान केंद्रावरील मतदान थांबवण्यात आलं. जेमुआतल्या 222 आणि 226 क्रमांकांच्या मतदान केंद्रांवर सुरक्षा दलाचे जवान नसल्यानं स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे स्थानिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. तर आसनसोलमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यांच्यात बाचाबाचीही झाली. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी काही लोकांनी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या कारवर हल्ला केला. यावरुन सुप्रियो यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. मतदानात घोटाळा करण्याचा कारस्थान रचलं जात असल्याचा आरोप सुप्रियोंनी केला. भाजपानं आसनसोलमधून बाबुल सुप्रियोंना उमेदवारी दिली आहे. सुप्रियो यांच्यासमोर तृणमूल काँग्रेसच्या मुनमुन सेन यांचं आव्हान आहे. 2014 मध्ये बाबुल सुप्रियोंनी तृणमूलच्या डोला सेन यांचा पराभव केला होता. त्यावेळी सुप्रियोंना 4 लाख 19 हजार 983 मतं मिळाली होती. तर डोला सेन यांना 3 लाख 49 हजार 503 मतं मिळवता आली. पश्चिम बंगालमधल्या 8 जागांवर आज मतदान होत आहे.