नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे 4-5 दिवस शिल्लक असताना पंतप्रधान पहिली पत्रकार परिषद घेतात ही अभूतपूर्व बाब आहे, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी लगावला. मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. त्यावरुन राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं. आम्ही मोदींच्या खोटेपणाचा पर्दाफाश केल्याचंदेखील राहुल म्हणाले. त्यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. पाच वर्षांत काँग्रेसनं विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम केलं. काँग्रेसची कामगिरी ए ग्रेड होती, असं प्रशस्तीपत्रक त्यांनी स्वत:च्या पक्षाला दिलं. मोदींना घेरण्याचं काम काँग्रेसनं केलं. 2014 मधील मोदींच्या प्रतिमा मोडण्यात काँग्रेसचा महत्त्वाचा वाटा असल्याचंदेखील ते म्हणाले. पंतप्रधान म्हणून मोदींनी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेवर त्यांनी सडकून टीका केली.पाच वर्षांत मोदी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेत आहेत. मात्र त्यांनी माझ्यासोबत राफेलच्या मुद्द्यावर वादविवाद करण्याचं आव्हान स्वीकारलं नाही. मी त्यांना वादविवादासाठी उघड आव्हान दिलं होतं. पण त्यांनी हे आव्हान स्वीकारलंच नाही. त्यांनी हे आव्हान का स्वीकारलं नाही, याचं उत्तर त्यांनी पत्रकारांना द्यावं, असं राहुल म्हणाले. मोदी प्रत्येकाला 15 लाख रुपये देणार होते. मात्र त्यांचं आश्वासन खोटं होतं, हे आम्ही जनतेला सांगितलं. आता जनतेला काय वाटतं, याचा कौल 23 मे रोजी मिळेल, असंदेखील ते पुढे म्हणाले. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरही सडकून टीका केली. 'या निवडणुकीत निवडणूक आयोग निष्पक्ष नव्हता. पंतप्रधान मोदी प्रचारात काहीही बोलत होते. मात्र तीच विधानं आम्ही केल्यास निवडणूक आयोगाकडून आक्षेप घेतला जात होता. मोदींच्या प्रचार कार्यक्रमानुसार निवडणूक आयोगानं निवडणुकीचा कार्यक्रम आखला होता. मोदी आणि भाजपानं निवडणुकीत सत्ता आणि पैशाचा बेसुमार वापर केला. पण आम्ही सत्य घेऊन लढलो,' अशा शब्दांत राहुल यांनी पंतप्रधानांसह निवडणूक आयोगावर तोफ डागली.