सिरसा: माजी पंतप्रधान राजीव गांधींवर टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'तुम्हाला माझ्याबद्दल बोलायचं आहे. राजीव गांधींबद्दल बोलायचं आहे. अगदी बिनधास्त बोला. पण राफेल प्रकरणात काय झालं, काय नाही झालं हेदेखील जनतेला सांगा,' असं आव्हान राहुल गांधींनी मोदींना दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी वारंवार राजीव गांधींवर टीका करत आहेत. या टीकेचा राहुल यांनी आज सिरसातल्या जनसभेत समाचार घेतला. 'तुम्हाला माझ्याबद्दल, माझ्या वडिलांबद्दल जे काही बोलायचं आहे, ते बोला. पण 2 कोटी रोजगारांवरही बोला. तुम्ही दिलेल्या 2 कोटी रोजगारांच्या आश्वासनाचं काय झालं, ते देशातल्या तरुणांना सांगा,' अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींवर पलटवार केला. यावेळी त्यांनी अनिल अंबानी आणि देशाबाहेर पळून गेलेल्या उद्योगपतींवरुन मोदींना लक्ष्य केलं. 'पंतप्रधान मोदी केवळ अनिल अंबानी, नीरव मोदींसारख्या 15 उद्योगपतींचं कर्ज माफ करतात. ते फक्त त्यांच्यासाठीच काम करतात. त्यांना गरिबांशी काहीही देणंघेणं नाही,' अशी टीका राहुल यांनी केली. तुम्ही तुमच्या श्रीमंत मित्रांना पैसे वाटा. मी गरिबांमध्ये पैसे वाटतो, असंदेखील ते पुढे म्हणाले. यावेळी राहुल गांधींनी न्याय योजनेचा उल्लेख केला. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मोदींनी 15 लाख रुपये देण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं. मात्र मोदी देशवासीयांशी खोटं बोलले. मी 15 लाख देऊ शकत नाही. पण 3 लाख 60 हजार देऊ शकतो आणि हे माझं वचन आहे, असं राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प असेल, या आश्वासनाचाही त्यांना पुनरुच्चार केला.
मोदीजी, राजीव गांधींसोबत राफेलवरही बोला; राहुल गांधींचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 3:35 PM