नवी दिल्ली- इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली आहे. त्यानंतर आता काँग्रेसनं मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पाकिस्तानची मोदींबरोबर अधिकृतरीत्या तडजोड झालेली आहे. त्यामुळेच येत्या निवडणुकीत मोदींना मतदान केल्यास ते पाकिस्तानला मत देण्यासारखंच ठरेल, असा आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानशी मोदींबरोबर अधिकृतरीत्या बोलणी झालेली आहेत. त्यामुळे मोदींना मत दिल्यास ते पाकिस्तानलाच मत समजलं जाईल. नवाज शरीफांचं मोदींवर प्रेम होते आणि आता इम्रान खानही मोदींचे फॅन आहेत. त्यामुळे मोदींची पोलखोल झाली आहे. पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसून लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हल्ला परतवून लावण्यास सज्ज असलेल्या भारतीय लढाऊ विमानांनी हा हल्ला परतवून लावला होता.
मोदींना मत म्हणजे पाकिस्तानलाच मत; इम्रानच्या 'बॉलिंग'नंतर काँग्रेसची 'बॅटिंग'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 5:16 PM