कॅनडाच्या नागरिकाला युद्धनौकेवर घेऊन जाता, ते कसं चालतं; काँग्रेसचा मोदींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 09:11 AM2019-05-10T09:11:57+5:302019-05-10T09:15:18+5:30
अक्षय कुमारचे आयएनएस सुमित्रावरील फोटो ट्विट
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधींनी आयएनएस विराटचा वापर टॅक्सीसारखा केला, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानामुळे भाजपा-काँग्रेसमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. राजीव गांधींनी सुट्टीसाठी आयएनएस विराटचा वापर केला, असा दावा करणाऱ्या मोदींना आता काँग्रेसचा सोशल मीडिया विभाग सांभाळणाऱ्या दिव्या स्पंदना यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अभिनेता अक्षय कुमारचे आयएनएस सुमित्रावरील फोटो ट्विट करत कॅनडाचा नागरिक असलेल्या व्यक्तीला पंतप्रधान मोदी आयएनएस सुमित्रावर घेऊन गेले होते. ते कसं काय चाललं, असा सवाल स्पंदना यांनी उपस्थित केला. यासोबतच त्यांनी सबसे बडा झूठा मोदी, असा हॅशटॅग वापरला आहे.
Yeh teek tha? @narendramodi you took a Canadian citizen @akshaykumar with you on-board INS Sumitra. #SabseBadaJhootaModi
— Divya Spandana/Ramya (@divyaspandana) May 9, 2019
Here’s the link to the article, most of us have not forgotten this controversy : https://t.co/jrPNUvk2Pypic.twitter.com/SWkl78rA4F
अक्षय कुमारकडे असलेल्या कॅनडाच्या नागरिकत्वावरुन वाद सुरू आहे. हाच संदर्भ देत दिव्या स्पंदना यांनी मोदींना लक्ष्य केलं. स्पंदना यांनी त्यांच्या ट्विटमध्ये एका लेखाची लिंक दिली आहे. '2016 मध्ये विशाखापट्टणममध्ये इंटरनॅशनल फ्लिट रिव्ह्यूला (आयएफआर) अक्षय कुमार त्याच्या कुटुंबासह उपस्थित होता. इतकंच नव्हे, तर अक्षयनं नौदलाच्या अधिकारी आणि इतर पाहुण्यांसोबत सुमित्रा जहाज चालवलं,' अशी माहिती स्पंदना यांनी ट्विट केलेल्या लेखात आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधींनी सुट्टी घालवण्यासाठी आयएनएस विराटचा वापर केला होता. राजीव यांनी स्वत:च्या सासुरवाडीतील मंडळींचा पाहुणचार करण्यासाठी त्यांना विराटवर नेलं होतं, असे दावे मोदींनी केले आहेत. यानंतर ऍडमिरल रामदास यांनी मोदींचा दावा खोटा असल्याचं म्हटलं. 'राजीव गांधी सुट्टीवर नव्हते, तो त्यांचा अधिकृत दौरा होता आणि त्यावेळी कोणताही परदेशी नागरिक त्यांच्यासोबत नव्हता,' असं रामदास म्हणाले.