मुंबई: लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्या दुपारी एकपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे आदेश शिवसेनेकडून प्रवक्त्यांना देण्यात आले आहेत. आज शिवसेना भवनात प्रवक्त्यांची बैठक झाली. यावेळी उद्या दुपारी एकपर्यंत प्रसिद्धी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना शिवसेनेकडून प्रवक्त्यांना देण्यात आल्या. या बैठकीला खासदार संजय राऊत यांनी मार्गदर्शन केलं. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान रविवारी (19 मे) पार पाडलं. यानंतर संध्याकाळी विविध वाहिन्यांचे एक्झिट पोल समोर आले. यातील जवळपास सर्वच पोल्सनी देशात एनडीएचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. याशिवाय राज्यातही शिवसेना-भाजपाला चांगलं यश मिळणार असल्याची शक्यता वर्तवली. मात्र तरीही शिवसेनेनं एक वाजेपर्यंत आपल्या प्रवक्त्यांना माध्यमांशी न बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुपारपर्यंत मतमोजणीचा कल स्पष्ट होऊ शकतो. त्यामुळेच शिवसेनेकडून ही सूचना केली गेल्याची शक्यता आहे.भाजपानं एनडीएतील मित्रपक्षांसाठी कालच दिल्लीत एका डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं. काल सकाळीच लंडनहून मुंबईत दाखल झालेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या पार्टीला जाणार का, याबद्दल साशंकता होती. मात्र उद्धव ठाकरे मुलगा आदित्यसह संध्याकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर ते डिनरलादेखील गेले. यावेळी झालेल्या बैठकीत सर्व मित्रपक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वावर विश्वास व्यक्त केला. त्याआधी भाजपा अध्यक्ष अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीदेखील उद्धव ठाकरे गांधीनगरला गेले होते. याशिवाय गेल्या महिन्यात वाराणसीत झालेल्या मोदींच्या रोड शोलादेखील उद्धव यांची उपस्थिती होती.
मौन की बात! उद्या एकपर्यंत प्रतिक्रिया न देण्याचे शिवसेनेचे प्रवक्त्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 7:54 PM