नवी दिल्ली: भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना खून प्रकरणातले आरोपी म्हणणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनानिवडणूक आयोगानं क्लीन चिट दिली आहे. मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये 23 एप्रिल रोजी झालेल्या सभेत राहुल यांनी शहांना खून प्रकरणातले आरोपी म्हटलं होतं. राहुल गांधींच्या विधानामुळे आचारसंहितेचा भंग न झाल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं. खून प्रकरणातले आरोपी भाजपा अध्यक्ष अमित शहा. वाह, काय शान आहे, असं राहुल गांधी जबलपूरमधल्या एका जनसभेला संबोधित करताना म्हणाले होते. राहुल यांच्या विधानाला भाजपानं आक्षेप घेतला. यानंतर भाजपाकडून या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली. राहुल गांधींच्या भाषणाचा तपशील निवडणूक आयोगानं जबलपूरच्या डीईओंकडून मागवण्यात आला. या भाषणाची आयोगानं पडताळणी केली. मात्र त्यात आचारसंहितेचा भंग झाल्याचं आढळून आलं नाही. राहुल गांधींच्या विधानावर भाजपा अध्यक्ष अमित शहांनी हल्ला चढवला होता. त्यांनी राहुल यांच्या कायद्याच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. 'माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात न्यायालयानं निकाल दिलेला आहे. तो आरोप राजकीय हेतूनं करण्यात आला होता. त्यात कोणतेही पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे मला राहुल गांधींच्या कायद्याबद्दलच्या ज्ञानाविषयी काही बोलायचं नाही,' असं अमित शहा म्हणाले होते.
अमित शहा खून प्रकरणातले आरोपी; राहुल गांधींच्या विधानाला निवडणूक आयोगाची क्लीन चिट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 11:11 AM