मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची अधिसूचना चार दिवसांनी निघणार असताना काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतील जागा वाटपाचा घोळ अजून संपलेला नाही. तर भाजपा-शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ २४ मार्चला कोल्हापूरात फुटणार आहे.राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. राधाकृष्ण विखे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी पक्षातून दबाव वाढत असून विखे गुरुवारी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. काँग्रेस-राष्टÑवादीत जागांचे वाटप कसे झाले आहे, हेही अजून गुलदस्त्यात असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. औरंगाबाद, पुणे येथे काँग्रेसकडे तगडा उमेदवार नसल्याने या जागांची मागणी राष्टÑवादीने केली. मात्र, काँग्रेसला ती मान्य नाही.अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित विकास आघाडीची सर्व जागा लढविण्याची घोषणा आणि खा. राजू शेट्टी यांची पुन्हा भाजपासोबत जाण्याची तयारी, यामुळे आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. खा. शेट्टी यांनी आघाडीकडे हातकणंगलेसह वर्धा आणि बुलडाणा या तीन जागांची मागणी केली आहे. बुलडाण्यातून रविकांत तुपकर तर वर्ध्यातून सुबोध मोहिते यांना ‘स्वाभिमानी’ची उमेदवारी असले. हातकणंगलेशिवाय आणखी जागा सोडण्याची आघाडीची तयारी नाही. कारण, बुलडाण्यात राजेंद्र शिंगणे (राष्टÑवादी) तर वर्धातून चारुलता टोकस यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.कोल्हापुरातून युतीचा प्रचार शुभारंभयुतीच्या प्रचाराचा शुभारंभ २४ मार्चला कोल्हापूरात होणार आहे. मंंगळवारी उशीरा रात्री मातोश्री येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुभाष देसाई आदी या वेळी उपस्थित होते. सभेपूर्वी दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांचे संयुक्त मेळावे होणार आहेत.काँग्रेसची आज बैठकप्रदेश काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची गुरुवारी मुंबईत बैठक होत आहे. त्यात जागा वाटप व राधाकृष्ण विखेंबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. विखे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला तर, पुढे काय? हा प्रश्न आहेच. कारण, काँग्रेस-४२ आणि राष्टÑवादी-४१ असे विधानसभेत संख्याबळ आहे. नारायण राणे यांचे पुत्र नीतेश काँग्रेसचे आमदार असले, तरी ते काँग्रेससोबत आहेत का, याची साशंकता आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद काँग्रेसकडे व विधानस परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद राष्टÑवादीकडे अशी विभागणी आहे.दानवे-खोतकर वाद मिटलाभाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जून खोतकर बंड करणार नाहीत. दोघेही मातोश्रीवर येतील. एकोप्याने राहणार असल्याची ग्वाही देतील, असे उद्धव यांनी स्पष्ट केले.राधाकृष्ण विखे दर्शनवारीवर!पुत्र सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे हे देवी-देवतांच्या दर्शनवारीवर निघाले आहेत़ बुधवारी त्यांनी तुळजापुरात तुळजाभवानी देवीच्या चरणी माथा टेकविला. आपली राजकीय भूमिका, वाटचाल गुरुवारी सार्इंच्या दर्शनानंतर हायकमांडशी चर्चा करुन जाहीर करु, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले़
Lok Sabha Election 2019: आघाडीत जागावाटपाचा खल; युतीचा नारळ फुटणार २४ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 4:29 AM