राहुल गांधींमध्ये दिसतो भविष्यातील पंतप्रधान; लालूंची कन्या भरभरून बोलली!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 07:31 PM2019-04-12T19:31:38+5:302019-04-12T19:38:25+5:30
लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा 'कंदील' हाती घेऊन काँग्रेस विजयाचा मार्ग शोधणार आहे.
'फिर एक बार, मोदी सरकार'चा नारा देत, भाजपा आणि सत्ताधारी एनडीए पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच निवडणूक लढवत आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षही जोमाने मैदानात उतरलेत. काही ठिकाणी काँग्रेसनं प्रादेशिक पक्षांचा हात धरून महाआघाडीही केलीय. पण, त्यांनी आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. अशातच, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. राहुल गांधींमध्ये मला भविष्यातील पंतप्रधान दिसतो, असं त्यांनी अगदी जाहीर करून टाकलंय. स्वाभाविकच, काँग्रेसला नवी उमेद मिळाली असून कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा 'कंदील' हाती घेऊन काँग्रेस विजयाचा मार्ग शोधणार आहे. या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांची मोठी मुलगी मीसा भारतीही रिंगणात उतरल्या आहेत. २०१४च्या निवडणुकीत पाटलीपुत्र मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. भाजपाचे राम कृपाल यादव इथून विजयी झाले होते. परंतु, यावेळी पुन्हा याच मतदारसंघातून मीसा भारती आपलं नशीब अजमावत आहेत. लालूप्रसाद तुरुंगात आहेत, कुटुंबात कलह आहे, तरीही त्यांनी प्रचारात झोकून दिलंय. या पार्श्वभूमीवर, इंडियन एक्स्प्रेसनं त्याची मुलाखत घेतली. त्यात राहुल यांच्या नेतृत्वाबद्दल मीसा भारतींनी अगदी मोकळेपणानं मत मांडलं.
राहुल गांधीकडे मी भविष्यातील पंतप्रधान म्हणून पाहते. संवेदनशीलता आणि दूरदृष्टीच्या जोरावर भारतातील सर्वात जुन्या पक्षाचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांनी दाखवून दिली आहे. भारतामध्ये सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक विविधता आहे आणि आर्थिक आणि सामाजिक विषमता आजही पाहायला मिळते. असं असताना, आत्मकेंद्री नेत्याऐवजी केवळ एक हळवा आणि उदार नेताच या देशाला समृद्धीकडे नेऊ शकतो, अशा शब्दांत मीसा भारती यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वगुणांबद्दल विश्वास व्यक्त केला.
सत्तेत आल्यास पंतप्रधान होण्यास तयार असल्याचे संकेत राहुल गांधी यांनी दिले आहेत. अर्थात, पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून राहुल गांधी किंवा कुणा अन्य नेत्याच्या नावावर महाआघाडीत एकमत नाही. त्यामुळेच, मीसा भारती यांनी केलेलं राहुल यांचं गुणगान काँग्रेससाठी विशेष महत्त्वाचं आहे.
दरम्यान, कुटुंबात कुठलेही मतभेद नाहीत, तेजस्वी आणि तेज प्रताप यांच्यात कलह नाही, असा दावा मीसा भारती यांनी केला. उमेदवारांच्या निवडीवरून थोडी फार नाराजी प्रत्येक पक्षात असतेच, पण ती क्षणिक होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.