मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हटवण्यासाठी प्रचार करा, असे आदेश काल दिल्यानंतर आज लगेचच मनसेप्रमुखराज ठाकरे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. राज यांनी पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. राज आणि पवार यांची गेल्या काही महिन्यांपासूनची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे. काल राज ठाकरेंनी जाहीर सभा घेत पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांवर शरसंधान साधलं. या देशाची नवी सुरुवात होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी दोन माणसं राजकीय पटलावरून बाजूला होणं आवश्यक आहे. त्यामुळे यांच्याविरोधात प्रचार करा. फायदा व्हायचा त्यांना होऊ दे, असे आदेश काल राज यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले. 'यंदाची निवडणूक मोदी आणि शहा विरुद्ध देश अशी आहे. कोण काँग्रेसचा, कोण राष्ट्रवादीचा याच्याशी कर्तव्यच नाही. मोदीमुक्त भारत झाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि हे मी गुढीपाडव्याच्या सभेतच सांगितलं होतं,' असं राज यांनी म्हटलं होतं.काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केल्यानंतर राज यांनी कालच्या सभेत आगामी निवडणुकीतील पक्षाची भूमिका स्पष्ट केली. याच्यापुढे मी ज्या सभा घेईन, त्या मोदी-शहा यांच्या विरोधातल्याच सभा असतील. देश खूप मोठ्या संकटात आहे आणि हे संकट एका माणसामुळे निर्माण झालं आहे. ते संकट दूर होणं खूप महत्त्वाचं आहे. मतदान जवळ आलं की भाजपावाले तुमच्याकडे येतील. थैल्या दिल्या तर घ्या. कारण यांनी देश पाच वर्षं लुटला आहे, अशी घणाघाती टीका राज यांनी केली होती. विधानसभेच्या तयारीला लागा. पुढच्या गोष्टी गुढीपाडव्याला समजावून सांगेन, असं राज म्हणाले.
राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; अनेक राजकीय विषयांवर 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 12:22 PM