निकालाआधी विरोधकांच्या गोटात हालचाली; 19 पक्षांची दिल्लीत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 04:42 PM2019-05-21T16:42:49+5:302019-05-21T16:45:46+5:30
निवडणूक निकालाआधी विरोधकांची मोर्चेबांधणी
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालाला दोन दिवस शिल्लक असताना विरोधकांचं बैठकांचं सत्र सुरू आहे. आज दुपारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये 19 विरोधी पक्षांची बैठक झाली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला निवडणूक आयोगाकडे ईव्हीएमबद्दल तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर विरोधक निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात जाण्यासाठी रवाना झाले.
या बैठकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची 100 टक्के पडताळणी करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मागणीबद्दल विरोधकांची निवडणूक आयोगासोबत चर्चादेखील झाली. त्याआधी सर्वोच्च न्यायालयानं या मागणीवरुन विरोधकांना फटकारलं. याशिवाय निवडणूक आयोगानंही ईव्हीएमबद्दल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या शंकांना प्रत्युत्तर दिलं.
Delhi: A meeting of opposition leaders is underway at the Constitution Club of India. pic.twitter.com/0AB86GJ2zB
— ANI (@ANI) May 21, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाला धक्का बसल्यास बिगर एनडीए सरकार स्थापन करण्याच्या शक्यतांवरदेखील बैठकीत चर्चा झाली. काँग्रेससह टीडीपी, बसपा, सपा, एनसीपी, टीएमसी आणि डाव्या पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. विरोधकांकडून बिगर एनडीए सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू असताना आज संध्याकाळी भाजपानं एनडीएतील घटक पक्षांची बैठक बोलावली आहे. एनडीएचा भाग असलेल्या सर्वच पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील या बैठकीला हजर असतील.