मुंबई : १९९१ साली बाळासाहेब विखे यांना कसे पराभूत केले होते, हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे विधान विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. वडील हयात नसताना त्यांच्याविषयी केले गेलेले वक्तव्य दुर्दैवी असून त्यामुळे आपण दुखावले गेलो आहोत. विखे घराण्याविषयी त्यांच्या मनात एवढा द्वेष असेल तर मी अहमदनगरमध्ये प्रचार करुन तरी काय उपयोग? असा सवाल विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.डॉ. सुजय विखे यांच्या भाजपाप्रवेशाने उठलेले राजकीय वादळ, त्यातून विरोधीपक्ष नेतेपदाच्या राजीनाम्याची झालेली मागणी, यावर राधाकृष्ण विखे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मुलगा सूजयने भाजपात प्रवेश केला, त्यामुळे आपण विरोधी पक्ष पदावर रहायचे की नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. उद्या आपण दिल्लीत त्यांना भेटायला जाणार आहोत, सगळी वस्तूस्थिती त्यांच्यासमोर मांडू. बाळासाहेब थोरात हे पक्षश्रेष्ठी नाहीत, त्यामुळे त्यांच्या विधानाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल त्यांनी मी वेळ आल्यावर बोलेन, असा इशाराही विखे यांनी दिला.काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतील जागा वाटपावर चर्चा सुरु असताना पवारांनी माझ्या वडीलांविषयी काढलेल्या उद्गाराने मी व्यथीत झालो. आजोबाविषयी असे बोलणे ऐकून कदाचित सूजयने भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असेल, असेही विखे म्हणाले.तुम्ही राष्टÑवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार का? असे विचारले असता ते म्हणाले, कोणी कुठे प्रचाराला जायचे यासाठी पक्षाचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे. ती जो निर्णय देईल त्याप्रमाणे मी प्रचाराला जाईन. अहमदनगरमध्ये मी प्रचार करणार नाही, कारण मी जरी तेथे प्रचाराला गेलो तरी माझ्यावर संशय घेतला जाईल, त्यापेक्षा मी न गेलेला बरा, असेही ते यावेळी म्हणाले.आम्ही इतिहास सांगितला - जयंत पाटीलशरद पवार यांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर कोणतीही टीका केली नव्हती. याआधी नगरमधून कोण निवडून आले होते याची चर्चा सुरु असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी बाळासाहेब विखे यांचा आपण पराभव केला होता, ही जुनी आठवण सांगितली, असे स्पष्टीकरण राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.तर आ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, १९९१ साली बाळासाहेब विखे हे अपक्ष उभे होते आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे यशवंतराव गडाख उभे होते. त्यावेळी काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांनीच स्वत: शरद पवार यांना कोणत्याही परिस्थीतीत काँग्रेस तेथून विजयी व्हायला हवी अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे पवारांनी तेथे जोरात प्रयत्न केले व विखेंचा पराभव केला होता. जर राजीव गांधी यांचा आदेश पाळल्याचे दु:ख विखे यांना असेल तर त्यावर मी काय बोलणार?
Lok Sabha Election 2019: पवारांचे वक्तव्य विखेंच्या जिव्हारी; नगरमध्ये प्रचार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 4:57 AM