Lok Sabha Election 2019: पवारांची माघार, आंबेडकरांच्या घोषणेने आघाडीसमोर अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 04:25 AM2019-03-12T04:25:01+5:302019-03-12T07:06:20+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला तीन मोठे धक्के
मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदारसंघाच्या मैदानातून निवडणुकीपूर्वीच घेतलेली माघार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांनी भाजपात जाण्याचा घेतलेला निर्णय आणि वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात लढण्याचा घेतलेला निर्णय यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला तीन मोठे धक्के बसले आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करण्याबाबत युतीपेक्षा आघाडी घेतली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अनेक बैठकी घेत आघाडीला आकार देण्याचा प्रयत्न केला. त्या मानाने युती कुठेही दृष्टिपथात नव्हती. अचानक युतीचे ठरले. जागावाटपाचा फॉर्म्यूलाही निश्चित झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीचा घोळ अजूनही सुरुच आहे. त्यातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ.सुजय यांनी भाजपात जाण्याचा निर्णय जाहीर केल्याने आघाडीला पहिला मोठा धक्का रविवारी बसला.
वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून लढण्याचा निर्णय सोमवारी जाहीर करून दुसरा धक्का दिला. सोलापुरात काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे लढणार आहेत. आंबेडकर यांच्या उमदेवारीने शिंदे यांची डोकेदुखी वाढणार असे मानले जाते. आंबेडकरांच्या निर्णयापाठोपाठ दुपारी मोठी बातमी धडकली ती शरद पवार माढामधून लढणार नसल्याची. त्यामुळे भाजपाच्या गोटात उत्साह संचारला. पवार यांच्या विरुद्ध भाजपाचे संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांचे नाव घेतले जात होते ते सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, एका पक्षाच्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाने उमेदवारी मागे घेणे हा भाजपाचा देशातील पहिला विजय आहे. पवार यांना पराभव दिसत असल्याने त्यांनी माघार घेतली.
भाजपाची निदर्शने
विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची उमेदवारी संकटात सापडली आहे. ते दिल्लीत तर कार्यकर्ते मुंबईत पक्षश्रेष्ठींना साकडे घालत आहेत़ गांधी यांच्या कार्यकर्त्यांनी विखे यांच्या उमेदवारीस मुंबईत थेट मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने करून विरोध केला.