लखनऊ: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील भाषणात दहशतवाद्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेसला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. 2014 च्या आधी भारतातली परिस्थिती श्रीलंकेसारखी होती. देशात अनेक ठिकाणी बॉम्ब स्फोट व्हायचे. मात्र गेल्या पाच वर्षांत देशातली स्थिती बदलली. दहशतवादी हल्ले कमी झाले, असा दावा मोदींनी केला. ते उत्तर प्रदेशातल्या आंबेडकरनगरमध्ये जनसभेला संबोधित करत होते. आपल्या शेजारच्या देशात दहशतवादाचा कारखाना सुरू आहे. दहशतवाद्यांना आपल्या देशात कमकुवत सरकार हवं आहे. त्यामुळे तुमचं दुर्लक्ष झाल्यास मोठी दुर्घटना घडेल, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या महाआघाडीवर सडकून टीका केली. 'देशानं सपा-बसपा-काँग्रेसचा खरा चेहरा जाणून घेणं गरजेचं आहे. मायावतींनी केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर केला. मात्र त्यांची तत्त्वं जपली नाहीत. समाजवादी पार्टीनं राम मनोहर लोहियांनी घालून दिलेला आदर्श मातीमोल केला,' अशा शब्दात मोदी महाआघाडीवर बरसले. मोदींनी महाआघाडीसोबतच काँग्रेसवरदेखील शरसंधान साधलं. 'काँग्रेसनं सत्तर वर्षे गरिबी हटवण्याची भाषा केली. मात्र कधीही मजुरांची काळजी केली नाही. त्यांनी केवळ स्वत:च्या कुटुंबाचा विचार केला. आमच्या सरकारनं मजुरांना निवृत्ती वेतन, विमा अशा सुविधा दिल्या,' असं मोदी म्हणाले. जनतेचं प्रेम पाहून विरोधकांचं बीपी वाढतं, असा टोलादेखील त्यांनी लगावला. मोदी आंबेडकर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या प्रचारासाठी आले होते.