लातूरः महाराष्ट्रातील वर्धा आणि गोंदियातील प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. पवार कुटुंबात कलह सुरू आहे, पुतण्यानेच पवारांची 'दांडी गुल' केली, हवेची दिशा ओळखून त्यांनी निवडणुकीआधीच माघार घेतली, अशी जोरदार 'बॅटिंग' त्यांनी केली होती. त्यानंतर, आज लातूरमध्येही त्यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं खरं, पण त्यांचा सूर थोडा वेगळा वाटला.
काँग्रेसकडून जनतेला अपेक्षा नाहीत, पण शरदराव तुम्हीसुद्धा?... असा प्रश्न करत मोदींनी पवारांना अन्य नेत्यांपेक्षा वेगळं ठरवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अनेकांचे कान टवकारले. राजकारण आपल्या जागी; परंतु, काश्मीर भारतापासून तोडू पाहणाऱ्यांसोबत, ज्यांना देशात दोन पंतप्रधान हवेत त्यांच्यासोबत शरदराव तुम्ही शोभून दिसत नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली. आधीच्या सभांप्रमाणे, शरद पवारांवर किंवा राष्ट्रवादीवर थेट टीका करणं मोदींनी टाळलं. उलट, काँग्रेसच त्यांच्या रडारवर होती. मोदींच्या या 'लातूर पॅटर्न'वरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. कारण, आजच्या भाषणात त्यांनी पवारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तोही अगदी लक्षात यावा इतका. तुम्हाला आम्ही इतर विरोधकांपेक्षा वेगळे समजतो, तुम्हाला भल्या-बुऱ्याची जाण आहे, तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यात का?, असा काहीसा आस्थेवाईक सूर मोदींच्या प्रश्नात होता. त्यात पुढची काही समीकरणं तर दडलेली नाहीत ना, अशी शंकाही अनेकांच्या मनात उपस्थित झाली आहे.
जम्मू-काश्मीरसाठी स्वतंत्र संविधान, पंतप्रधान आणि राष्ट्रपती आपण पुन्हा आणू, या ओमर अब्दुल्ला यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं होतं. या वक्तव्याचा धागा पकडूनच, देश तोडायला निघालेल्या पक्षांना काँग्रेस पाठिंबा देत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. या 'महामिलावटी' लोकांसोबत शरदराव तुम्ही शोभून दिसत नाही, असंही त्यांनी सूचित केलं.
शरद पवार हे आपले राजकीय गुरू आहेत, अनेक विषयांवर आपण त्यांचा सल्ला घेतो, असं म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचासभेत 'गुरूं'वरच 'स्ट्राईक' केला होता. पार्थ पवारच्या उमेदवारीनंतर पवार कुटुंबातील ज्या कौटुंबिक कुरबुरींची कुजबूज होती, त्या मोदींनी जाहीरपणे चर्चेत आणल्यानं राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले होते. सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह स्वतः शरद पवारांनीही मोदींना प्रत्युत्तर दिलं. माझं घर भरलेलं आहे, तुम्ही तुमचं घर पाहा, असं त्यांनी सुनावलं. या पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदींनी पवारविरोधाचा सूर काहीसा मवाळ केल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीनंतर भाजपासोबत जाऊ शकते, असा संशय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार आणि मनसे यांचं खास नातं, मोदींविरोधातील 'राज'गर्जना, याचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच, शिक्षणातील 'लातूर पॅटर्न'प्रमाणे यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी मोदींनीही 'लातूर पॅटर्न' स्वीकारला का, हे पाहावं लागेल.