Lok Sabha Election 2019: राजकीय पक्षांवर अनिश्चिततेचे ढग कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 01:00 AM2019-03-11T01:00:53+5:302019-03-11T01:01:42+5:30
विरोधी पक्षांकडे सक्षम उमेदवारांची वानवा, भाजपा-सेनेत शीतयुद्ध सुरूच
- अजित मांडके
ठाणे : शिवसेना आणि भाजपाची यूती झाल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघात पुन्हा शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे. परंतु भाजपाच्या २३ नगरसेवकांनी त्यांच्या नावाला विरोध दर्शविला आहे. प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत हा विरोध मावळलेला असेल, असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. दुसरीकडे, लोकशाही आघाडीत उमेदवारीबाबत अद्यापही संभ्रम असून हा मतदारसंघ माजी मंत्री गणेश नाईक यांनी लढवावा, अशी इच्छा पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केली आहे. परंतु नाईक इच्छुक नसल्याने आनंद परांजपे यांचे नाव चर्चेत आले आहे.
ठाणे लोकसभेतील तीन विधानसभा मतदारसंघांचा विचार केल्यास येथील दोन मतदारसंघ शिवसेनेकडे असून, एक मतदार संघ भाजपाकडे आहे. नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ राष्ट्रवादीकडे, तर एक भाजपाकडे आहे. मिराभार्इंदर विधानसभा क्षेत्रावरही भाजपाचेच वर्चस्व आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात मात्र केवळ ऐरोली हा एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळेच नाईक कुटुंब निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे. गणेश नाईक यांनी ही निवडणूक लढवावी, अशी श्रेष्ठींची इच्छा आहे. त्यामुळे त्यांची मनधरनी करण्याचे काम सुरु आहे. नाईक तयार झालेच नाही, तर ही माळ राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राजन विचारे यांना ठाण्यातील भाजपाच्या सर्व २३ नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. इतर मतदारसंघांमध्ये शिवसेना भाजपाच्या उमेदवाराला विरोध करीत आहेत, त्याचप्रकारे ठाण्यात सेनेला भाजपाचा विरोध असल्याचे बोलले जात आहे.
ठाणे, मिरा भार्इंदर आणि नवी मुंबईत काँग्रेसचे फारसे वजन नाही. त्यामुळे निवडणुकीची खिंड राष्ट्रवादीलाच लढवावी लागणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. येथील ८0 टक्के नागरीक कामानिमित्त मुंबईला जातात. त्यांच्यासाठी रेल्वेच्या वाढीव फेऱ्या दिल्या नाही. नवीन रेल्वे स्थानकाचे काम प्रलंबित असून, मेट्रो प्रत्यक्षात केव्हा सुरु होईल, याचा पत्ता नाही. परिवहनच्या समस्या, घनकचऱ्याची समस्या आणि शाई धरणाचा प्रश्नही सुटु शकलेला नाही. अमृत किंवा स्मार्ट सिटीतून तुटपुंजा निधी आला आहे. त्यामुळे मोठे प्रोजेक्टसुध्दा सुरु होऊ शकलेले नाहीत. याशिवाय सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, मुंबईत ५00 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात सवलत देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ठाणेकरांच्या तोंडाला मात्र पाने पुसली आहेत. विरोधक हा मुद्दा निवडणुकीत लावून धरण्याची शक्यता आहे. मनसेने निवडणूक लढवल्यास अभिजित पानसे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचा या मतदारसंघात फारसा प्रभाव नसल्याने त्यांनी आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला किंवा नाही, तरी त्याचा फारसा फरक पडण्याची शक्यता कमीच आहे.
ठाण्यात सेना, नवी मुंबईत राष्ट्रवादीचा जोर
२0१४ नंतर झालेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत ठाणे महापालिकेत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली. भाजपाचे येथे २३ नगरसेवक आहेत. नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीची सत्ता आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे विधानसभा आणि विधान परिषद मिळून पाच आमदार असून, शिवसेनेचे तीन आमदार आहेत. राष्ट्रवादीकडे या मतदारसंघात एकच आमदार आहे.
नवी मुंबई महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. ठाण्यात या पक्षाचे आठ, तर मिरा भार्इंदरमध्ये एकही नगरसेवक नाही.
आघाडीत असलेल्या काँग्रेसचे मिरा भार्इंदरमध्ये १३, ठाण्यात २ आणि नवीमुंबईत १0 नगरसेवक आहेत. त्यामुळे याचा आघाडीच्या उमेदवाराला कितपत फायदा होईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
युती झाली, पण कार्यकर्ते अस्वस्थच
- प्रशांत माने
कल्याण : वाटाघाटीत शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या कल्याण लोकसभेत भाजपाबरोबर युती झाली असली, तरी पक्षांतर्गत कुरबुरीने सर्व काही आलबेल आहे, असे नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेने आपले पत्ते अद्याप उघड केलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात कोण, याबाबत उत्सुकता लागून आहे. राष्ट्रवादीकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने मनसेला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. निवडणूक घोषित होऊनही दोघांची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच असल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघ हा युतीचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातील सहा विधानसभांमध्ये शिवसेना २, सहयोगी अपक्षासह भाजपाचे २ आणि राष्ट्रवादीचे २ आमदार आहेत. युती झाल्याने शिवसेनेचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेच उमेदवार राहणार आहेत. राष्ट्रवादी आणि मनसेकडून मात्र उमेदवार निश्चित करण्यात आलेले नाहीत. राष्ट्रवादीकडे लोकसभेसाठी तगडा उमेदवार नाही. जे आहेत, त्यांना विधानसभेत रूची आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी मनसेला सोडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. असे घडले, तर शिवसेनेला एकतर्फी वाटणारी निवडणूक चुरशीची होऊ शकते. गत निवडणुकीत तब्बल अडिच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे विजयी झाले होते. अंतर्गत गटबाजी हे पक्षांसाठी नवीन नाही. परंतू निवडणुकीच्या पार्श्वभूमिवरही याचे प्रमाण राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाढल्याचे पहावयास मिळत आहे. पद वाटपावरून कल्याण लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या कल्याण पूर्वेत नाराजी उफाळली आहे.दुसरीकडे बाजूलाच लागून असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिममधील सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला द्यावा अशी मागणी करुन भाजपच्या उमेदवाराला सहकार्य करण्यास नकार दिल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अशीच असहकाराची भूमिका कल्याण लोकसभेतील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही घेऊ शकतात, असे बोलले जात आहे.
आंबेडकरांची अस्पष्टता
भाजपा-सेनेची युती झाली, तरी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम करण्याची गरज आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची सभा भिवंडी लोकसभेतील कल्याण पश्चिम मतदारसंघात झाली होती. परंतू या आघाडीनेही कल्याण लोकसभेबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.
आघाडीसह मनसेची भूमिका गुलदस्त्यात
- पंढरीनाथ कुंभार
भिवंडी : भाजपा-सेनेची यूती झाली असली, तरी ग्रामिण भागात शिवसैनिकांनी भाजपाच्या कपिल पाटील यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. भरीसभर, काँग्रेस व शिवसेना सत्तेत असलेल्या भिवंडी महानगरपालिकेचे समीकरणही युतीच्या पारड्यात पडणारे नाही. याचे परिणाम लोकसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची भूमिका अद्याप निश्चित नसून, हे दोन्ही पक्ष या मतदारसंघात निर्णायक स्थितीत आहेत.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी भिवंडी पूर्व शिवसेना, पश्चिम भाजपा तर ग्रामीण मतदारसंघही शिवसेनेच्या ताब्यात आहे. या विधानसभा मतदारसंघांतील मते निर्णायक ठरणार आहेत. आघाडीचा विचार करता तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे परंपरागत मतदार आहेत. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व तेवढे दमदार नाही. मनसेची अवस्थाही काहीशी तशीच आहे. त्यामुळे मनसे आघाडीसोबत आला किंवा नाही, तरी फारसा फरक पडणार नाही. काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे हे यंदाही निवडणुकीच्या तयारीत आहेत; मात्र पक्षाने अद्याप त्यांचे नाव अद्याप जाहीर केले नाही.
मागील निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातही मोदी लाटेचा प्रभाव जाणवला. २००९ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन खासदार सुरेश टावरे यांनी युतीचे उमेदवार, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचा पराभव केला होता. शहरातील मुस्लिम बहुसंख्य मतदार व ग्रामिण भागातील मताधिक्यामुळे टावरे यांना विजय मिळाला होता. २००९ मध्ये लोकसभा मतदारसंघाची नव्याने रचना झाल्याने मतदारांची ओळख नव्हती, तसेच युतीचे कार्यकर्ते जनसंपर्कात कमी पडले. राष्ट्रवादीतून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राहिलेले, तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेले कपील पाटील यांनी २०१४ मध्ये भाजपाचे लोकसभेचे तिकीट मिळविले. मोदी लाट आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकून ते निवडून आले. काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना मतदारांनी नाकारले होते.
सपाची भूमिका निर्णायक
समाजवादी पक्षाचेही या भागात परंपरागत मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. या पक्षाचा उमेदवार अद्याप निश्चित नसला, तरी निवडणुकीवर प्रभाव टाकण्याची क्षमता या पक्षात आहे. समाजवादी पक्षाने मध्यंतरी आघाडीला ही जागा सोडण्याची मागणी केली होती. त्यावर अद्याप निर्णय झाला नसून, सूत्रांच्या माहितीनुसार आघाडीकडून ही जागा सोडण्याची शक्यता कमी असल्याचे समजते.