सोलापूर: सुशील कुमार शिंदेंनी सोलापूरमधील दलित समाजासाठी काय केलं, असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला. घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचा नातूच घटनेचा खून करण्यास निघाला आहे, अशी टीका शिंदे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आंबेडकरांनी प्रत्युत्तर दिलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघात उतरत प्रकाश आंबेडकरांनीसुशीलकुमार शिंदेंना आव्हान दिलं आहे. 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टानं राज्यघटना तयार केली. त्यांचेच नातू जातीयवादी पक्षाशी युती करून त्या राज्यघटनेचा खून करण्यास निघाले आहेत,' अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काल केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसनेच घटना बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. 'राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते यांनी संसदीय लोकशाहीऐवजी अध्यक्षीय निवडणुकीचा पुरस्कार केला होता. इंदिरा गांधींना विचारुन हे विधान केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मग घटना बदलण्याचा प्रयत्न कोणी केला?' असा प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केला. सुशीलकुमार शिंदेंची स्मरणशक्ती फार कमी असल्याचा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला. 'शिंदेंच्या डोक्यातील चिपची मेमरी फार कमी जीबीची आहे. मात्र माझ्या डोक्यातील मेमरी चिप जास्त जीबीची आहे. त्यामुळे सर्व गोष्टी माझ्या व्यवस्थित लक्षात राहतात,' असं आंबेडकर म्हणाले. ढसाळे, ढाले आणि ओवैसींची भाषा एकच असल्याचं त्यांनी म्हटलं. काल शिंदेंनी आंबेडकरांवर जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला होता. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वधर्मसमभावासाठी लोकशाही, संविधान आणलं. मात्र, त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या एमआयएमशी मैत्री करून राज्यघटनेला गाडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत,' अशी टीका शिंदेंनी केली होती.
सुशीलकुमार शिंदे दलितांमधलं बुजगावणं; प्रकाश आंबेडकरांची जळजळीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 11:08 AM