अमेठी: लोकसभा निवडणुकीचं पाचव्या टप्प्यातलं मतदान जवळ आलं असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अमेठीवासीयांना पत्र लिहिलं आहे. अमेठी माझं कुटुंब आहे. त्यामुळे अमेठीशी माझं भावनिक नातं आहे. एखाद्या कुटुंबातील सदस्यांचं जसं एकमेकांशी नातं असतं, तसंच नातं माझं आणि अमेठीतल्या जनतेचं असल्याचं राहुल यांनी पत्रात म्हटलं आहे. भाजपाकडून असत्याचा प्रचार केला जात असून केवळ पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं टीकास्त्र राहुल यांनी सोडलं. अमेठीवासीयांना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे राफेलचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसची मालक जनता आहे. तर भाजपाचे मालक अनिल अंबानी आहेत, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी राफेलचा प्रत्यक्ष उल्लेख न करता भाजपावर शरसंधान साधलं. 'काँग्रेस पक्ष गरीब, महिला, छोट्या दुकानदारांसाठी काम करू इच्छितो. पण भाजपाला केवळ 15 ते 20 उद्योगपतींना सरकारचं मालक करायचं आहे. देशात काँग्रेसचं सरकार येताच अमेठीतली थांबलेली विकासकामं पुन्हा सुरू होतील,' असं राहुल यांनी पत्रात म्हटलं आहे.
'काँग्रेसची मालक जनता, तर भाजपाचे मालक अनिल अंबानी'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 2:50 PM