Lok Sabha Election 2019: प्रिया दत्त यांच्या उमेदवारीच्या घोषणेने रंगत वाढण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 05:58 AM2019-03-15T05:58:57+5:302019-04-04T12:59:17+5:30
उत्तर मध्य मुंबईत पूनम महाजन यांच्यासमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता
मुंबई : उत्तर मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास आधी नकार देणाऱ्या व नंतर लढण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या माजी खासदार प्रिया दत्त यांना काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने या निवडणुकीतील रंगत वाढण्याची शक्यता आहे.
या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्यासमोर दत्त यांच्या उमेदवारीमुळे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत. दत्त या मतदारसंघातून २००५ व २००९ मध्ये विजयी झाल्या होत्या. मात्र, २०१४ मध्ये मोदी लाटेत पूनम महाजन यांनी बाजी मारली होती. २०१४ मध्ये समाजवादी पक्षातर्फे अबू आझमींचे पुत्र फरहान आझमी, आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्ष यांचे उमेदवार रिंगणात असताना त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नव्हता. त्यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये २००९ मध्ये दत्त यांनी महेश जेठमलानी यांचा पराभव केला होता.
२०१४ मध्ये पूनम महाजन यांना ४ लाख ७८ हजार ५३५ मते मिळाली होती तर प्रिया दत्त यांना २ लाख ९१ हजार ७६४ मते मिळाली होती.
सध्या या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी विलेपार्लेत भाजपाचे अॅड. पराग अळवणी, वांद्रे पश्चिममध्ये भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार, वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेच्या तृप्ती सावंत, कलिनात शिवसेनेचे संजय पोतनीस, कुर्ला येथून शिवसेनेचे मंगेश कुडाळकर तर चांदिवलीतून काँग्रेसचे आरिफ नसीम खान आमदार आहेत. शिवसेना व भाजपाची युती झालेली असल्याने कागदावर तरी भाजपासाठी ही निवडणूक सहजसोपी असल्याचे चित्र आहे. मात्र विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा मतदारांशी पुरेसा संपर्क नसल्याचा आक्षेप असल्याने त्यांना मतदारांची नाराजी दूर करावी लागणार आहे. दुसरीकडे, २०१४ मधील पराभवानंतर प्रिया दत्त यांनीदेखील मतदारांशी फारसा संपर्क ठेवलेला नव्हता. तसेच, लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे जाहीर केले होते. मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुंबई दौºयातील त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला व त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. दत्त यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात असला तरी त्यांनादेखील पराभवाचे तोंड यापूर्वी पाहावे लागले असल्याने या वेळी जास्त परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
...त्यामुळेच चुरस निर्माण होण्याचा अंदाज
पूनम महाजन यांच्यावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचे देशभरात दौरे होत असल्याने मतदारसंघात त्यांचा संपर्क कमी झाला होता. त्याचा फटका बसण्याची शक्यता असल्याने व गतवेळीप्रमाणे यंदा मोदी लाट दिसत नसल्याने महाजन यांना विजयासाठी जास्त मेहनत करावी लागणार आहे. महाजन यांच्याविरोधात लढण्यासाठी दत्त यांनी पूर्वी नकार दिल्याने काँग्रेसकडे उमेदवाराची वानवा होती. अशा परिस्थितीत निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता होती. मात्र, दत्त यांच्या होकारामुळे येथील निवडणुकीत चुरस निर्माण होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.