नवी दिल्ली- लोकसभा निवडणूक 2019ची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधींनी एक रोड शोदेखील केला. रोड शोनंतर प्रियंका गांधींनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. मतदारांनो माझ्या भावाची काळजी घ्या, तो खूप धाडसी आहे, तुमची नक्कीच काळजी घेईल, असं प्रियंका गांधी मतदारांना उद्देशून म्हणाल्या आहेत.रोड शोदरम्यान प्रियंका गांधींनी जनतेला संबोधित केलं आहे. माझा भाऊ, माझा खरा मित्र आहे, आतापर्यंत ज्यांना भेटले आहे, त्यात माझ्या भाऊ हा खूपच साहसी आहे. वायनाडकरांनो यांची काळजी घ्या, तो तुम्हाला कधीही निराश करणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. उत्तर प्रदेशातील पारंपरिक असलेला अमेठी आणि केरळातील वायनाड या दोन मतदारसंघांतून राहुल गांधी आपले नशीब आजमावत आहेत. राहुल गांधी आज वायनाड मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधींनी निवडणूक लढवून दक्षिण भारतातल्या मतदारांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला आहे.वायनाड लोकसभा मतदारसंघाची जागा ही कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांच्या सीमांना लागून आहे. राहुल गांधी अमेठीमधूनही निवडणूक लढवत आहेत. या जागेवरून राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं दक्षिण भारतातल्या मतदारांना आकर्षिक करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडीचं सरकार आहे. तर तामिळनाडूमध्ये काँग्रेस डीएमकेबरोबर निवडणुकीच्या रिंगणात आहे. या दोन्ही मित्र पक्षांच्या जोरावर काँग्रेस सत्तेत परतू शकते, अशीही आशा व्यक्त केली जात आहे.
माझ्या भावाला सांभाळा, तो निराश करणार नाही; प्रियंका गांधींची भावनिक साद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 3:20 PM