कोलकाता: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमधील वाद टोकाला गेला आहे. तृणमूलवर केलेले आरोप सिद्ध करा, अन्यथा तुरुंगात पाठवेन, असा इशारा तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहांना दिला. तृणमूलवर खोटे आरोप करताना लाज वाटत नाही का, असा सवालदेखील ममता यांनी विचारला. कोलकात्यात अमित शहांच्या रोड शोवेळी झालेला हिंसाचार आणि त्यानंतर शहांनी तृणमूलवर केलेले आरोप या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी बोलत होत्या. शहांचे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. 'भाजपानं निवडणूक आयोगाकडे आमची तक्रार केल्याचं काल रात्री समजलं. पंतप्रधान मोदींच्या सभेनंतर आमची सभा होऊ नये, यासाठी भाजपानं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. निवडणूक आयोग भाजपाचा भाऊ आहे. आधी आयोग निष्पक्ष होता. मात्र आता निवडणूक आयोग विकला गेला आहे, असं प्रत्येकजण म्हणतो,' अशा शब्दांत त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर टीकेची झोड उठवली. भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांनाही ममता यांनी लक्ष्य केलं. 'आम्ही विद्यासागर यांचा पुतळा उभारु असं मोदी म्हणतात. बंगालकडे पुतळा उभारण्यासाठी पैसा आहे. तुम्ही पुतळा उभाराल. पण 200 वर्षांचा वारसा पुन्हा आणू शकाल का?', असा सवाल ममता यांनी उपस्थित केला. पुतळा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तोडला, याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि तुम्ही आमच्यावरच आरोप करता. खोटं बोलायला तुम्हाला लाज वाटत नाही का? आमच्यावर केलेले आरोप सिद्ध करा. अन्यथा तुरुंगात टाकेन, असा इशारा त्यांनी दिला.
आरोप सिद्ध करा, अन्यथा तुरुंगात पाठवेन; ममता बॅनर्जींचा अमित शहांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 2:59 PM