निमच: मुख्यमंत्र्यांची नावं घेताना चुकल्यानं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड या काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावांचा उल्लेख करताना राहुल गांधींचा गोंधळ झाला. राहुल गांधींनी जनसभेला संबोधित करताना व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नेत्यांचा उल्लेख केला. मात्र आपल्याच मुख्यमंत्र्यांची नावं घेताना त्यांनी चूक केली. 14 मे रोजी मध्ये निमचमध्ये हा प्रकार झाला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री भूपेश बघेलजी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री हुकूम सिंह कराडाजी, असं म्हणत राहुल यांनी भाषणाची सुरुवात केली. मध्य प्रदेश, छत्तीसगड या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा कमलनाथ यांच्या खांद्यावर आहे. तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून भूपेश बघेल काम करत आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही मुख्यमंत्र्यांची निवड राहुल यांनीच केली आहे. मात्र तरीही मंचावर उपस्थित असलेल्या नेत्यांचा उल्लेख करताना राहुल यांचा गोंधळ उडाला. हा व्हिडीओ सध्या भाजपाकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची नावंदेखील लक्षात न ठेवू शकणाऱ्या व्यक्तीला पंतप्रधान करायचं का, असा सवाल काहींनी सोशल मीडियावर उपस्थित केला. याआधी 2018 मध्ये राहुल गांधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी मोक्षगुंडम विश्वेशवरय्या यांचं नाव घेताना चुकले होते. त्यांनी अनेकदा विश्वेशवरय्या यांचं नाव उच्चारलं. राहुल गांधींसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील अनेकदा भाषण करताना चुकले आहेत. 6 अब्ज मतदारांनी आपल्याला कौल दिल्याचं मोदी यांनी जानेवारी 2018 मध्ये दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत म्हटलं होतं.