रॉबर्ट वाड्रांना तिरंगा कळेना! आधी पॅराग्वेचा झेंडा ट्विट; फजिती होताच लगेच डिलीट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 08:09 PM2019-05-12T20:09:16+5:302019-05-12T20:14:18+5:30
झेंडा चुकल्यानं रॉबर्ट वाड्रा ट्विटरवर ट्रोल
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातलं मतदान आज पार पडलं. दिल्लीसह देशातल्या बड्या राजकीय नेत्यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आज मतदान केलं. प्रियंका यांच्यासोबत त्यांचे पती रॉबर्ट वाड्रांदेखील मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी शाई लावलेल्या बोटासह सेल्फी ट्विट केला. मात्र त्यांनी भारताऐवजी पॅराग्वेचा झेंडा वापरला. त्यामुळे ते ट्विटरवर ट्रोल झाले.
'आपला अधिकार, आपलं सामर्थ्य', असं ट्विट रॉबर्ट वाड्रांनी केलं. 'तुम्ही सर्वांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडायला हवं. आपल्या प्रियजनांसाठी एक चांगलं भविष्य घडवणाऱ्यासाठी आपण अशांची मदत करायला हवी, जे आपल्या देशाला धर्मनिरपेक्ष आणि सुरक्षित ठेवतील,' असंदेखील त्यांनी पुढे या ट्विटमध्ये म्हटलं. मात्र या ट्विटमध्ये त्यांनी पॅराग्वेचा झेंडा वापरल्यानं ते ट्रोलर्सच्या रडारवर आले. अनेकांनी वाड्रांचा खरपूस समाचार केला. यानंतर त्यांनी ट्विट डिलीट केलं आणि पुन्हा नवं ट्विट केलं.
#LokSabhaElections2019pic.twitter.com/YH8kEyI0Rv
— Robert Vadra (@irobertvadra) May 12, 2019
त्याआधी रॉबर्ट वाड्रांनी प्रियंका गांधीसोबत मतदान केलं. त्यावेळी प्रियंकांना आम आदमी पार्टीसोबतच्या न झालेल्या आघाडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आपसोबतच्या आघाडीनं काँग्रेसला फायदा झाला नसता, असं प्रियंका म्हणाल्या. मला हिंसा मान्य नाही. जनता सत्ताधाऱ्यांना मतदानातून उत्तर देईल. काँग्रेसला यंदा अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.