मुंबई: महापालिका निवडणुकीवेळी थेट शिवसेना नेतृत्त्वावर तुटून पडलेले भाजपा खासदार किरीट सोमय्या सध्या मातोश्री भेटीसाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेना-भाजपा युती झाली असली, तरी शिवसैनिकांचा सोमय्या यांच्यावरील राग कायम आहे. त्यामुळेच त्यांना निवडणुकीत कोणत्याही प्रकारचं सहकार्य न करण्याचा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. त्यामुळेच आता सोमय्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप त्यांना भेटीसाठी वेळ मिळालेली नाही. शिवसैनिकांचा राग दूर करण्यासाठी किरीट सोमय्या मातोश्री भेटीसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र त्यांना मातोश्रीवरुन भेट नाकारण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत, अनिल देसाई आणि उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्न सोमय्यांकडून सुरू आहे. मात्र अद्याप तरी त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही. मुंबई महापालिका निवडणुकीवेळी भाजपा-शिवसेना आमनेसामने होती. त्यावेळी शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेत माफियाराज असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला होता. उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधताना सोमय्या यांनी 'बांद्र्याचा बॉस' असे शब्द वापरले होते. यानंतर शिवसेना-भाजपा एकत्र आले. मात्र उद्धव ठाकरेंवर सोमय्या यांनी केलेली जहरी टीका आजही शिवसैनिकांच्या लक्षात आहे. ईशान्य मुंबईतून सोमय्या यांना उमेदवारी मिळणार का, याचा निर्णय उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी सोमय्या यांचे प्रयत्न सुरू असताना काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केलेले प्रवीण छेडा यांनी काल (27 मार्च) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याशिवाय या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी गटनेते मनोज कोटक, पराग शाह, मंत्री प्रकाश मेहता उत्सुक असल्याचं समजतं.निवडणुकीच्या आधी शिवसेना-भाजपाचा युती जाहीर झाली त्यानंतर अनेक ठिकाणी या दोन्ही पक्षांनी एकमेकांशी जुळवून घेतल्याची उदाहरणं आहेत. मात्र ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपानं किरीट सोमय्यांऐवजी दुसऱ्या कोणाला तरी उमेदवारी द्यावी, अशी शिवसैनिकांची मागणी आहे. किरीट सोमय्या यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे.
शिवसेनेच्या मनधरणीसाठी सोमय्यांचा पुढाकार; मात्र 'मातोश्री'वरुन भेटीस नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 11:51 AM