कोलकाता: भाजपाच्या रोड शोमध्ये तृणमूलच्या गुंडांनी हिंसाचार घडवल्याचा आरोप करणाऱ्या भाजपा अध्यक्ष अमित शहांना तृणमूल काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. कोलकात्यात हिंसाचार घडवण्यासाठी अमित शहांनीच बाहेरुन गुंड आणले होते, असा पलटवार तृणमूलनं केला. अमित शहांच्या पत्रकार परिषदेनंतर तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी पत्रकारांना संबोधित करत भाजपावर गंभीर आरोप केले.
कोलकाता विद्यापीठातल्या ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच तोडफोड केली, असा दावा ओब्रायन यांनी केला. रोड शोमध्ये झालेल्या हिंसाचारात भाजपाचा हात असल्याचे पुरावे आपल्याकडे असून ते लवकरच निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचं त्यांनी सांगितलं. अमित शहांनी कोलकात्यात हिंसाचार घडवण्यासाठी बाहेरुन गुंड आणले. त्याचे व्हिडीओ आमच्याकडे आहेत, असा दावा करत ओब्रायन यांनी काही व्हिडीओदेखील पत्रकारांना दाखवले. बंगालची अस्मिता असलेल्या विद्यासागर यांचा पुतळा भाजपाच्या गुंडांनी तोडला. विद्यासागर यांचं महात्म्य तुम्हाला विकीपिडियावरुन समजणार नाही, अशी टीका ओब्रायन यांनी केली. कोलकात्यात रोड शो करण्यासाठी बाहेरुन माणसं आणायची गरज काय, असा सवाल ओब्रायन यांनी उपस्थित केला. 'रोड शोमध्ये कोणीही सहभागी होऊ शकतं. पण तेजिंदर बग्गा कोण आहेत. त्यांना एकदा अटक झाली होती. दिल्लीत त्यांनी एका व्यक्तीच्या श्रीमुखात भडकावली होती. शहा अशा गुडांना कोलकात्यात घेऊन गेले होते,' अशा शब्दांत ओब्रायन यांनी शहांवर सडकून टीका केली होती. तर बग्गा यांनी हिंसाचार झालेल्या भागात आपण उपस्थितच नव्हतो, असा दावा केला. 'हिंसाचार झालेल्या भागात मी हजर होतो, हे ओब्रायन यांनी सिद्ध करावं. त्यांनी हे सिद्ध केल्यास मी राजकारण सोडेन आणि त्यांना हे सिद्ध करण्यात अपयश आल्यास त्यांनी राजकारण सोडावं,' असं आव्हान त्यांनी दिलं.