- सागर गुजर सातारा : राष्ट्रवादीमधील अंतर्गत विरोध झुगारून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे. पवारांच्या आदेशानुसार उदयनराजे व राष्ट्रवादीच्या आमदारांतील मतभेदांना विराम मिळाला, तरी मनभेद कायम असल्याचे चित्र आहे.विधानपरिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पक्षाचे प्राबल्य असतानाही राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे यांचा काँगे्रसचे उमेदवार मोहनराव कदम यांनी पराभव केला. या निवडणुकीपासूनच उदयनराजेंविरुद्ध राष्ट्रवादीचे नेते असा उभा दावा जिल्ह्यात निर्माण झाला. तसेच सातारा नगरपालिका निवडणुकीवेळी नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या वेदांतिकाराजे भोसलेंच्या पराभवाची सल अजून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनात आहे.नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात आ. शशिकांत शिंदे यांनी ‘उदयनराजेंना लोकसभेच्या प्रचारासाठी राज्यभर फिरवा... सातारा लोकसभा मतदारसंघात त्यांच्यासाठी आम्ही प्रचार करू,’ असे जाहीरपणे सांगितले होते. पण विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी उदयनराजेंच्या बाजूने जाहीरपणे भूमिका मांडलेली नाही.पृथ्वीराज चव्हाण यांचेही प्रतिकूल मतकाँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही उदयनराजेंबाबत मळभ असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी कºहाडाच्या काँगे्रस मेळाव्यात स्पष्ट केले. तर ‘अगोदर सगळी राष्ट्रवादी उदयनराजेंसोबत जाऊ द्या, मग आपण त्यांच्यासोबत जाऊ,’ असे स्पष्टीकरण आमदार जयकुमार गोरे यांनी केले. या परिस्थितीत उदयनराजे स्वकियांचे चक्रव्यूह कसे भेदतात, हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
Lok Sabha Election 2019: उदयनराजे स्वकीयांच्या चक्रव्यूहात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 4:50 AM