पिलीभित: भाजपाचे उमेदवार वरुण गांधी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीला मतदान म्हणजे पाकिस्तानला मतदान, असं वादग्रस्त विधान वरुण गांधींनी प्रचारादरम्यान केलं. महागठबंधन पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व करतं. त्यामुळे पाकिस्तानऐवजी भारतमातेसाठी मतदान करा, असं आवाहन गांधींनी केलं. ते पिलीभितमध्ये बोलत होते. तुम्ही भारतासोबत आहात की पाकिस्तानसोबत, असा सवाल वरुण गांधींनी पिलीभीतमध्ये जनसभेला संबोधित करताना विचारला. तुम्ही महागठबंधनला मतदान करणार असाल, तर ती सर्व मंडळी पाकिस्तानची आहेत. यात काही चुकीचं आहे का, असा प्रश्न त्यांनी पुढे उपस्थित केला. यावेळी त्यांनी समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंग यांच्यावर सडकून टीका केली. 'बाबरी मशीद पाडण्यात आली, त्यावेळी मुलायम सिंग यांनी राम भक्तांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्यात 500 जणांनी प्राण गमावला. मुलायम यांचे हात रक्तानं माखलेले आहेत आणि आम्ही ते विसरू शकणार नाही,' अशा शब्दांत वरुण गांधींनी मुलायम सिंग यांच्यावर तोंडसुख घेतलं. याआधी वरुण गांधींनी एका प्रचारसभेला संबोधित करताना वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावेळी त्यांनी बसपा उमेदवारावर पातळी सोडून टीका केली होती. 'लोकांनी त्यांच्या पापांची भीती बाळगावी. कोणा मोनू-टोनूची भीती बाळगू नये. मी संजय गांधींचा मुलगा आहे. अशा माणसांना मी माझ्या बुटाची लेस सोडायला ठेवतो. मी इथे तुमच्यासमोर उभा आहे आणि माझ्या उपस्थितीत कोणीही तुम्हाला काहीही बोलण्याची हिंमत दाखवू शकत नाही,' असं वादग्रस्त विधान गांधींनी केलं होतं. त्याआधी वरुण यांच्या आई आणि केंद्रीय मंत्री मेनका गांधींनी प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्यानं वादात सापडल्या. 'तुम्ही मला मतदान करा. अन्यथा मी निवडून आल्यावर तुम्ही काम घेऊन याल, तेव्हा मी त्याला प्रतिसाद देणार नाही,' अशी धमकीच त्यांनी दिली होती.
सपा-बसपाला मतदान म्हणजे पाकिस्तानला मतदान- वरुण गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 9:36 AM