पुणे : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजून आचारसंहिता लागू झाली तरी पुणे मतदारसंघात अजून सामसूमच आहे. भाजपा आणि काँग्रेसमध्ये अजून उमेदवारांची चाचपणीच सुरू असल्याने ‘उमेदवार कोण?’ हाच प्रश्न सध्या पुण्यात विचारला जात आहे.भाजपात विद्यमान खासदार अनिल शिरोळे व पालकमंत्री गिरीश बापट या दोघांमध्ये चूरस आहे. शिरोळे यांनी शहरातील वेगवेगळ्या स्तरांमधील प्रमुख लोकांबरोबर मुलगा सिद्धार्थ याच्या माध्यमातून संवाद साधण्यास सुरूवात केली आहे. बापट यांनी उमेदवारीमधील आपला रस लपवून ठेवलेला नाही, मात्र पक्ष देईल तो आदेश मान्य आहे, अशीच त्यांची भूमिका आहे. राज्याच्या राजकारणात आमदार म्हणून पाच टर्म काढल्यानंतर आता खासदार म्हणून राष्ट्रीय राजकारणात काम करायला आवडेल, असे ते सांगतात.पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघासाठी युतीचे समन्वयक म्हणून बापट तसेच शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोºहे यांची नियुक्ती झाल्याचे वृत्त बुधवारी सकाळी जाहीर झाले. त्यानंतर त्यांच्या गोटात बरीच खळबळ उडाली. उमेदवारी मिळणार की नाही अशी शंका त्यामुळे व्यक्त होऊ लागली. मात्र रात्री पालिकेतील पक्षाच्या सर्व नगरसेवकांसाठी भोजनाचा कार्यक्रम ठेवून बापट यांनी अजूनही आपण स्पर्धेत असल्याचे दाखवून दिले. काँग्रेसमध्येही उमेदवारीबाबत अजूनही अनिश्चितता आहे. माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अॅड. अभय छाजेड, अरविंद शिंदे व पक्षाबाहेरून प्रवीण गायकवाड, संजय काकडे यांची नावे चर्चेत आहेत.
Lok Sabha Election 2019: उमेदवार कोण? पुण्यनगरीमध्ये एकच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 4:26 AM