लोकसभा निवडणूक: स्टार खेळाडूंच्या राजकीय मैदानातील कामगिरीवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 03:02 AM2019-04-24T03:02:23+5:302019-04-24T07:14:45+5:30

गंभीर, विजेंदरसह अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात

Lok Sabha election: Attention to the performance of Star Sportsmen's political field | लोकसभा निवडणूक: स्टार खेळाडूंच्या राजकीय मैदानातील कामगिरीवर लक्ष

लोकसभा निवडणूक: स्टार खेळाडूंच्या राजकीय मैदानातील कामगिरीवर लक्ष

Next

नवी दिल्ली : चित्रपट कलाकारांप्रमाणेच खेळाडूही वेगवेगळ्या राजकीय पक्षांतर्फे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुष्टीयोद्धा विजेंदर सिंगकाँग्रेसतर्फे दक्षिण दिल्ली मतदारसंघातून उभा असून माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला भाजपने पूर्व दिल्लीतून रिंगणात उतरवले आहे.

गंभीरने गेल्या महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी तो गेली दोन ते तीन वर्षे भाजपच्या बाजूने मते व्यक्त करीतच होता. त्यामुळे त्याच्या उमेदवारीने कोणाला फारसे आश्चर्य वाटलेले नाही. विजेंदर सिंगचे नावही काँग्रेसतर्फे चर्चेत होतेच. तो हरियाणातील असल्यामुळे त्याला दिल्ली नवी नाही. गेल्या वेळी माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद भाजपतर्फे बिहारमधून निवडून आले होते. पण त्यांचे व भाजपचे अलीकडील काळात जमतच नव्हते आणि ते बंडखोर म्हणूनच ओळखले जात होते. त्यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता ते धनबादमधून निवडणूक लढवत आहेत. आझाद यांचे वडील काँग्रेसचे नेते होते आणि काही काळ ते बिहारचे मुख्यमंत्रीही होते.

अनेक पुरस्कार मिळवलेले नेमबाज तसेच केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री व भाजपचे नेते राज्यवर्धन राठोड राजस्थानातील जयपूर (ग्रामीण)मधून निवडणूक लढवत असून, त्यांचा सामना भारताच्या माजी अ‍ॅथलिट कृष्णा पुनियाविरुद्ध होईल. पुनियानेही तीनदा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकही पटकावले आहे. या ठिकाणी दोन खेळाडू रिंगणात समोरासमोर असल्याने लोकांची उत्सुकता वाढली आहे.

मोहम्मद अझरुद्दिनही काँग्रेसतर्फे निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा होती. याआधीही ते काँग्रेसतर्फे लोकसभेवर निवडून गेले होता. पण यंदा त्यांचे नाव काँग्रेसच्या यादीत दिसलेले नाही. मात्र ते काँग्रेसचा प्रचार करीत आहेत. त्याचप्रमाणे बायचुंग भुतियादेखील यंदा निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. भुतियाने २0१४ ची लोकसभा निवडणूक तृणमूल काँग्रेसतर्फे दार्जिलिंगमधून लढवली होती. पण तो त्यात पराभूत झाला होता.

मुष्टीयोद्धा सुशीलकुमारही काँग्रेसतर्फे निवडणूक लढणार, असे सांगण्यात येत होते. तो सरकारी अधिकारी असल्याने त्याने निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा देण्याचे ठरवले. मात्र तो स्वीकारण्यात आला नाही; आणि त्यामुळे काँग्रेसने त्याचे नाव रद्द केले, असे सांगण्यात येते. आणखी एक मुष्टीयोद्धा नरसिंग यादवही काँग्रेसच्या जवळचा मानला जातो. तोही मुंबईत साहाय्यक पोलीस आयुक्त आहे. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्या व्यासपीठावर तो दिसल्याने नुकताच त्याच्याविरुद्ध मुंबईच्या आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सिद्धूची बोलती बंद
पंजाबचे मंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू हेही काँग्रेसच्या प्रचारात उतरले आहेत. ते उत्तम वक्ते आहेत. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी अनेक काँग्रेस उमेदवारांकडून मागणी येत आहे. पण एका सभेतील वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर सध्या तीन दिवस प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: Lok Sabha election: Attention to the performance of Star Sportsmen's political field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.