स्वत: चोरी करायची अन् दुसऱ्याला चोर म्हणायचं ही काँग्रेसची सवय; भाजपाचा प्रतिहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 05:34 PM2019-04-15T17:34:13+5:302019-04-15T17:37:31+5:30
उर्मिला मांतोडकर यांच्या प्रचारावेळी झालेल्या गोंधळावरुन भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपली
मुंबई: आपण करायचं आणि आरोप दुसऱ्यावर करायचा ही काँग्रेसची जुनी सवय असल्याची टीका भाजपा खासदार गोपाळ शेट्टींनी केली. आज सकाळी बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर काँग्रेसच्या प्रचारावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी 'मोदी-मोदी' अशी घोषणाबाजी करत हुल्लडबाजी केली. यावरुन काँग्रेस उमेदवार उर्मिला मांतोडकर यांनी भाजपावर सडकून टीका केली. या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. चोरी स्वत: करायची आणि दुसऱ्याला चोर म्हणायचं ही काँग्रेसची सवय असल्याचं भाजपाचे विद्यमान खासदार आणि उमेदवार शेट्टींनी म्हटलं.
बोरिवली स्थानकाजवळ उर्मिला मांतोडकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रचार करत असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत मोदी-मोदी अशी घोषणाबाजी केली. या घटनेचा गोपाळ शेट्टींनी तीव्र शब्दांत निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 'जसा काँग्रेसला त्यांचा प्रचार करण्याचा अधिकार आहे, जसा भाजपाला त्यांचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. तसंच जनतेलादेखील आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांच्यावर हल्ला करणं चुकीचं आहे,' अशा शब्दांमध्ये शेट्टींनी काँग्रेसवर शरसंधान साधलं.
हिंमत असेल, तर केलेल्या कामांच्या बळावर निवडणूक लढवा. छुपे आणि चोर हल्ले करून निवडणूक लढू नका, असं आवाहन त्यांनी केलं. आपली अनामत रक्कमही वाचणार नाही, हे काँग्रेसच्या लक्षात आलं आहे. म्हणून ते अशा प्रकारची कृत्यं करून स्वत:साठी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण लोक समजूतदार आहेत. त्यांना कोण खरं कोण खोटं ते कळतं, असं शेट्टींनी म्हटलं. आज सकाळी उर्मिला मातोंडकर यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीचा सामना करावा लागला. यानंतर मातोंडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत पोलीस संरक्षणाचीही मागणी केली. या हुल्लडबाजीमध्ये एक महिला प्रवासी पडल्यानं जखमी झाली. तर हुल्लडबाज कार्यकर्त्यांना काँग्रेसनं चोप दिला.