Opinion Poll: भाजपा उत्तर प्रदेश राखणार; पण 23 जागा घटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 08:33 PM2019-04-08T20:33:23+5:302019-04-08T20:47:44+5:30
सपा-बसपाला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता कमी
नवी दिल्ली: सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या, दिल्लीचं प्रवेशद्वार मानला जाणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजपाला 23 जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं मित्रपक्षासह तब्बल 73 जागा जिंकत उत्तर प्रदेशात दणदणीत विजय मिळवला होता. मात्र यंदा भाजपाच्या जागा 50 वर येण्याचा अंदाज टाईम्स नाऊ-व्हीएमआरनं वर्तवला आहे. तर समाजवादी पार्टी-बहुजन समाज पार्टीच्या महाआघाडीला 27 जागा मिळतील, अशी आकडेवारी सर्वेक्षणातून समोर आली आहे.
काँग्रेसनं पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी प्रियंका गांधींकडे सोपवली. त्यानंतर त्यांनी प्रचाराचा धडाका लावला. मात्र याचा फायदा काँग्रेसला होताना दिसत नाही. काँग्रेसच्या उत्तर प्रदेशातील जागा 2 वरुन 3 वर जातील, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. भाजपाच्या उत्तर प्रदेशातील मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. एनडीएला 2014 मध्ये 43.30 मतदारांनी कौल दिला. त्यावेळी त्यांना 73 (भाजपा 71, अपना दल 2) जागा मिळाल्या होत्या. आता करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपाला 45.10 टक्के मतं मिळू शकतात. मात्र त्यांच्या जागा 23 नं कमी होऊन 50 वर येण्याची शक्यता आहे.
भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढत असली तरी, सपा-बसपाच्या महाआघाडीमुळे भाजपाला फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सपा, बसपानं 2014 मध्ये स्वतंत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी सपाला 5 जागा मिळाल्या होत्या. तर बसपाला भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र या दोघांच्या मतांची एकत्रित टक्केवारी 42.70 टक्के इतकी होती. मात्र आता त्यांना मिळणाऱ्या मतांमध्ये पाच टक्क्यांची घट होऊ शकते. यंदा त्यांना 27 जागा मिळू शकतात.
काँग्रेसची कामगिरी उत्तर प्रदेशात फारशी चांगली होण्याची शक्यता नाही. काँग्रेसला 2014 मध्ये केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. राहुल गांधी अमेठी, तर सोनिया गांधी रायबरेलीतून बाजी मारली होती. त्यावेळी काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी 8.40 इतकी होती. यंदा काँग्रेसची मतांची टक्केवारी वाढू शकते. काँग्रेसच्या मतांमध्ये अडीच टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा काँग्रेसला 3 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे.