मुंबई : भाजपाचे धुळ्यातील नाराज आमदार अनिल गोटेंनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात लढण्यासाठी गोटेंनी दंड थोपटले आहेत. धुळ्यात भाजपाच्या खासदाराचा पराभव करणं हेच आपलं ध्येय असल्याचं गोटेंनी म्हटलं आहे. मोदी सरकारमध्ये असलेले संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे लोकसभेत धुळ्याचं प्रतिनिधीत्व करतात. भाजप आमदार अनिल गोटे 26 वर्षांचं वैर विसरुन शरद पवार यांच्या भेटीला गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. धुळे महापालिका निवडणुकीपासून गोटे पक्षावर नाराज आहेत. आता त्यांनी थेट खासदार भामरेंविरोधात निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठीच्या मोर्चेबांधणीसाठी गोटेंनी पवारांची भेट घेतली. 'धुळ्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. गुन्हेगारी, टक्केवारी वाढली आहे. पक्षातील ही घाण साफ करायची आहे,' असं गोटे म्हणाले. 'मी माझी भूमिका शरद पवारांना सांगितली आहे. मला माझा पक्ष स्वच्छ करायचा आहे. आता मला कशी मदत करायची, हा त्यांचा निर्णय असेल. मी पुन्हा पवारांना भेटणार आहे,' असं गोटेंनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीआधी गोटेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत.तेलगी प्रकरणावरुन गोटे आणि पवार यांच्यात हाडवैर निर्माण झालं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गोटे यांना तेलगीचा मित्र म्हटल्यानं वाद निर्माण झाला होता. पवार आणि गोटे यांचं विळ्या भोपळ्याचं नातं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं होतं. मात्र आता गोटेंनी भामरेंच्या पराभवासाठी पवारांची भेट घेतली आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरुपी शत्रू किंवा मित्र नसतो, असं गोटेंनी पवारांच्या भेटीनंतर म्हटलं.
धुळ्यात धुळवड; भाजपाच्या सफाईसाठी गोटेंची पवारांसोबत दिलजमाई?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 12:01 PM