Opinion Poll: राज्यात भाजपा-शिवसेनेच्या 'इतक्या' जागा घटणार; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 08:52 PM2019-04-07T20:52:24+5:302019-04-07T20:54:51+5:30
राज्यात युतीला फटका बसण्याची शक्यता
मुंबई: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा कौल भाजपा-शिवसेना युतीला मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील 48 पैकी 35 जागांवर युती विजयी होईल, असा अंदाज आहे. तर आघाडीची कामगिरी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत काही प्रमाणात सुधारण्याची शक्यता आहे. एबीपी-सी व्होटरनं लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू होण्याआधी सर्वेक्षण केलं आहे.
एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, यंदा राज्यात भाजपा-शिवसेना युतीला एकूण 35 जागांवर यश मिळू शकतं. यंदा भाजपा 25 जागांवर निवडणूक लढवणार आहे. यातील 21 जागांवर त्यांना यश मिळेल, असा अंदाज आहे. मात्र गेली साडेचार वर्षे सरकारवर टीकेचे बाण सोडणाऱ्या शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. 23 जागा लढवणाऱ्या शिवसेनेला 14 जागांवर यश मिळू शकतं. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे 18 उमेदवार विजयी झाले होते. मात्र यंदा त्यांना 4 जागांवर फटका बसू शकतो. तर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची केवळ एक जागा कमी होईल, असा अंदाज आहे. 2014 मध्ये युतीनं राज्यात 42 (भाजपा-22, शिवसेना-18, स्वाभिमानी-1) जागा जिंकल्या होत्या. त्यात यंदा सात जागांची घट होऊ शकते.
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं सात जागा जिंकल्या होत्या. यंदा त्यामध्ये सहा जागांची वाढ होऊ शकते, असा अंदाज आहे. 2014 मध्ये मोदी लाटेत काँग्रेसचं पानिपत झालं होतं. त्यांना केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. त्या यंदा 8 वर जातील, असा अंदाज आहे. तर राष्ट्रवादीच्या जागांमध्ये कोणताच बदल होणार नाही. त्या पाचच राहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.