सुलतानपूर: भाजपा खासदार मेनका गांधी यांनी मुस्लिमांना प्रचारादरम्यान उघडउघड धमकी देत असल्याचं समोर आलं आहे. मी निवडणूक जिंकणारच आहे. त्यामुळे मला साथ द्या. अन्यथा काम उद्या माझ्याकडे एखादं काम घेऊन याल, तेव्हा मी काय करेन ते समजून जा, असं मेनका गांधी यांनी म्हटलं. सुलतानपूरमधील एका प्रचारसभेत त्या बोलत होत्या. केंद्रीय मंत्री असलेल्या मेनका गांधी सुलतानपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मुस्लिमबहुल तुराबखानी भागातील प्रचारसभेत त्यांनी उपस्थितांना जवळपास धमकीच दिली. 'मी निवडणूक जिंकणारच आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला साथ द्या. आम्ही खुल्या मनानं आलो आहोत. उद्या तुम्हाला माझी गरज लागेल. त्यामुळे तुम्ही आताच पाया रचून ठेवा. हीच योग्य वेळ आहे,' अशा शब्दांमध्ये मेनकांनी मुस्लिमांना धमकावलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मी निवडून आले, तर तुमची कामं करणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारादेखील मेनका यांनी दिला. 'माझ्या फाऊंडेशननं तुमच्यासाठी 1000 कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र जेव्हा निवडणूक येते, तेव्हा तुम्ही म्हणता आम्ही भाजपाला मतदान करणार नाही. मी तर निवडणूक जिंकले आहे. मात्र हा विजय तुमच्याशिवाय कडू आहे. त्यामुळेच जेव्हा निकाल लागेल आणि तुमच्या बूथवरुन 50 किंवा 100 मतं येतील. त्यानंतर तुम्ही माझ्याकडे कामासाठी याल, तेव्हा समजून जा,' अशी धमकी मेनकांनी दिली.
मला साथ द्या, नाहीतर...; मेनका गांधींची मुस्लिम मतदारांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 5:28 PM