बसपाची बँकेतील 'माया' पाहून डोळे दीपतील; भाजपा, काँग्रेसपेक्षाही जास्त पैसा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 01:30 PM2019-04-15T13:30:24+5:302019-04-15T13:33:51+5:30
बसपाकडे भाजपापेक्षा आठपट बँक बॅलेन्स
नवी दिल्ली: देशभरात निवडणुकीचा जोर पाहायला मिळतो आहे. सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. निवडणूक आली की बाजारात जास्त पैसा येतो. किंबहुना याच पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जातात. ज्या उमेदवाराकडे जास्त पैसा त्याची निवडून येण्याची शक्यता अधिक हे समीकरणच झालं आहे. त्यामुळे जवळपास सर्वच पक्षांमध्ये अशाच उमेदवारांना तिकीटं दिली जातात.
निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडे मोठ्या प्रमाणात देणग्यांच्या स्वरुपात पैसा येतो. भाजपा गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत आहे. मात्र बँक खात्यातील रकमेचा विचार केल्यास मायावतींची बहुजन समाज पार्टी पहिल्या क्रमांकावर आहे. 25 फेब्रुवारीला बसपानं निवडणूक आयोगाकडे आपल्या बँक खात्यातील पैशांचा तपशील दिला. बसपाच्या बँक खात्यात 669 कोटी रुपये आहेत. ही रक्कम भाजपाच्या बँक खात्यातील रकमेच्या तब्बल आठपट आहेत. विशेष म्हणजे 2014 च्या निवडणुकीत बसपाला खातंही उघडता आलं नव्हतं. त्यामुळे लोकसभेत पक्षाचा एकही खासदार नाही. मात्र तरीही बसपाच्या बँक खात्यात मोठी 'माया' आहे.
देशात सत्तेवर असलेल्या आणि गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक राज्यांमध्ये सत्तेवर आलेल्या भाजपाच्या बँक खात्यात 81 कोटी 82 लाख 28 हजार रुपये आहेत. 2017-18 या कालावधीत पक्षाला 1027 कोटी रुपये मिळाले. यातील 758 कोटी रुपये पक्षानं खर्च केले. या काळात इतकी रक्कम कोणत्याही पक्षानं खर्च केलेली नाही. सर्वाधिक काळ केंद्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेसनं निवडणूक आयोगाला बँक खात्याचा तपशील दिलेला नाही. गेल्या मे महिन्यात कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसनं आपल्या बँक खात्यात 196 कोटी रुपये असल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती.