अब की बार किसकी सरकार? दिल्लीतला 'हा' मतदारसंघ ठरवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 12:41 PM2019-05-01T12:41:32+5:302019-05-01T14:07:00+5:30
मतदारसंघात तीन पक्षांमध्ये टक्कर
नवी दिल्ली: दिल्लीतल्या चांदनी चौक मतदारसंघाला देशाचा मूड अतिशय उत्तमपणे समजतो असं मानलं जातं. गेल्या 15 लोकसभा निवडणुकांचा विचार केल्यास बहुतांश वेळा चांदनी चौकमध्ये जिंकणाऱ्या पक्षानंच केंद्रात सत्ता स्थापन केली आहे. इतिहासावर नजर टाकल्यास केवळ दोनवेळाच चांदनी चौकवासीयांचा अंदाज चुकला आहे. यंदा चांदनी चौकमध्ये तिहेरी लढत आहे. या ठिकाणी आम आदमा पार्टी, काँग्रेस आणि भाजपामध्ये कडवी टक्कर पाहायला मिळत आहे.
चांदनी चौक दिल्लीतला सर्वात लहान मतदारसंघ आहे. या ठिकाणी 15 लाख 61 हजार 828 मतदार आहेत. या मतदारसंघात भाजपाकडून डॉ. हर्षवर्धन, काँग्रेसकडून जयप्रकाश अग्रवाल आणि आपकडून पंकज गुप्ता मैदानात आहेत. चांदनी चौकचा निवडणूक इतिहास मोठा रंजक आहे. या मतदारसंघातून 9 वेळा काँग्रेसचे, 4 वेळा भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर प्रत्येकी एक-एकदा जनसंघ आणि जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
चांदनी चौक मतदारसंघ 1956 मध्ये अस्तित्वात आला. 1957 मध्ये मतदारसंघात पहिल्यांदा निवडणूक झाली. यावेळी चांदनी चौकवासीयांनी देशातील मतदारांची नस अचूक ओळखली. त्यावेळी काँग्रेसचे राधा रमन या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि देशातही काँग्रेसचं सरकार आलं. 2014 मध्ये देशात मोदी सरकार आलं. त्यावेळी या मतदारसंघातून भाजपाचे डॉ. हर्षवर्धन विजयी झाले. त्यामुळे यंदा चांदनी चौक कोणाला कौल देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.