काँग्रेसला धक्का; आमदार कोळंबकर यांचा राहुल शेवाळेंना पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 01:43 PM2019-04-17T13:43:59+5:302019-04-17T13:54:38+5:30
लवकरच भाजपात प्रवेश करणार
मुंबई: काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार राहुल शेवाळेंना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत काँग्रेसला धक्का बसला आहे. कट्टर राणे समर्थक मानले जाणारे कोळंबकर लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केल्यानं कोळंबकर आणि काँग्रेसमध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर आता कोळंबकर यांनी थेट युतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आज कोळंबकर यांची भेट घेतली.
दक्षिण मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात लढत आहे. महिन्याभरापूर्वीच कालिदास कोळंबकर त्यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या फलकावरुन चर्चेत आले होते. कोळंबकर यांच्या कार्यालयाबाहेरील फलकावरुन काँग्रेस नेत्यांचे फोटो हटवून त्यांच्या जागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. याबद्दल बोलताना मी काँग्रेसमधून बाहेर पडलो नाही. काँग्रेसमधून मला बाहेर करण्यात आलं, असं कोळंबकर यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांचे आभार मानल्यावर विभागातल्या कट आऊटवरुन माझा फोटो काढण्यात आला. मग मी त्यांचे फोटो माझ्या बॅनरवर का लावू, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जनतेला लोकप्रतिनिधींकडून कामं हवी आहेत. जी व्यक्ती कामं करुन देते, जनता त्याच्याच पाठिशी उभी राहते. मुख्यमंत्री प्रलंबित कामं मार्गी लावतात. त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं, तर त्यात गैर काय?, असा प्रश्न कोळंबकर यांनी विचारला. कोळंबकर यांनी पाठिंबा दिल्यानं शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आनंद व्यक्त केला. कोळंबकर माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. त्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य मिळाल्यानं माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.