मणिपूर: लोकसभा निवडणुकीच्या आधी मणिपूरमधील गावांच्या सरपंचांना बंडखोर गट असलेल्या कुकी नॅशनल आर्मीनं धमकी दिली आहे. भाजपाला मतदान करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा, अशी धमकी कुकी आर्मीनं दिली. भाजपाला 90 टक्के मतदान न झाल्यास त्याचे परिणाम लोकांना भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आला आहे. कुकी नॅशनल आर्मीचा कमांडर थांगबोई हाओकिपनं मुनतफई आणि मोरेह गावात सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी गावांचे सरपंचदेखील उपस्थित होते. या सभेत थांगबोईनं भाजपाचे उमेदवार एचएस बेंजामिन मेट यांचा उल्लेख केला. गरज पडल्यास हिंसाचाराचा आधारदेखील घेतला जाईल, असा इशारा थांगबोईंनी सभेत दिला. ग्रामस्थांना आदेशाचं पालन करावंच लागेल. अन्यथा परिणामांना सामोरं जावे लागेल, अशी धमकी थांगबोईनं दिली.गटात महिलांची संख्या कमी असूनही 11 एप्रिलला 200 महिलांची एक विशेष तुकडी मतदान केंद्रांवर तैनात असेल, असं थांगबोईनं सांगितलं. पुरुष असो वा महिला, प्रत्येकाला आदेश मानावा लागेल. अन्यथा कोणालाही सोडणार नाही, असंदेखील त्यानं सभेला उपस्थित असणाऱ्यांना सांगितलं. 'मोरेह क्षेत्रात 21 मतदान केंद्रं आहेत. या ठिकाणच्या मतदानाच्या टक्केवारीची पडताळणी केली जाईल,' असं थांगबोईनं म्हटलं. कुकी नॅशनल आर्मीची स्थापना 1988 मध्ये झाली आहे. या संघटनेच्या पहिल्या कॅडरला म्यानमारमध्ये काचिन इंडिपेंडंट आर्मीनं प्रशिक्षण दिलं होतं. या संघटनेकडून एके-सीरीज, जी-सीरिज, एम-सीरिज रायफल्स आणि 60 एमएम मोर्टारसारख्या धोकादायक हत्यारांचा वापर केला जातो. या संघटनेचे 600 सक्रिय सदस्य आहेत.
भाजपाला मतदान करा, अन्यथा हिंसाचार घडवू; मणिपुरात बंडखोर गटाची ग्रामस्थांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 5:51 PM