मडगाव: महिला सबलीकरणाच्या दृष्टीने स्वत:ला अग्रेसर म्हणवणारे गोवा राज्य लोकसभा निवडणुकीत महिलांना प्रतिनिधीत्व देण्याच्या बाबतीत मात्र खूप मागास असल्याचे दिसून आले आहे. मागच्या 39 वर्षांच्या इतिहासाचा धांडोळा घेतल्यास आतापर्यंत केवळ एकच महिला लोकसभेवर निवडून गेली आहे. एवढेच नव्हे तर मागच्या 39 वर्षात पुरुष उमेदवारांची संख्या 227 एवढी झालेली असताना त्या तुलनेत केवळ दहा महिलांनीच लोकसभेची निवडणूक लढवली आहे. यंदाच्या निवडणुकीत दक्षिण गोव्यातून शिवसेनेच्या राखी नाईक तर उत्तर गोव्यातून ऐश्र्वर्या साळगावकर (अपक्ष) अशा दोन महिला रिंगणात आहेत.
1980 च्या लोकसभा निवडणुकीत मगोच्या तिकीटावर उत्तर गोव्यातून निवडणूक संयोगिता राणे लढल्या होत्या. गोव्यातून लोकसभेवर गेलेल्या त्या एकमेव महिला खासदार ठरल्या. 1980 या निवडणुकीत त्यांना एकूण 70,730 मते मिळाली होती. काँग्रेसचे पुरुषोत्तम काकोडकर (43,030 मते) यांच्यावर त्यांनी 27,700 मतांनी विजय मिळवला होता. यावेळी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले गोपाळ मयेकर यांना 42,097 मते मिळाली होती. सातव्या लोकसभा निवडणुकीत ही घटना घडली होती. त्यावेळी श्रीमती राणे यांना जवळपास 40 टक्के मते प्राप्त झाली होती.
1984 च्या आठव्या लोकसभा निवडणुकीत राणे या गोवा काँग्रेसच्या उमेदवार म्हणून रिंगणात उत्तर गोव्यातून उतरल्या होत्या. त्यावेळी त्यांना केवळ 29,261 मते मिळाली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसचे शांताराम नाईक हे पहिल्यांदा उत्तर गोव्यातून खासदार म्हणून निवडून आले होते. 1991 च्या दहाव्या लोकसभा निवडणुकीतही संयोगिता राणे यांचे नाव सुरुवातीला उत्तर गोव्यातून मगोच्या उमेदवार म्हणून पुढे आले होते. मात्र ऐनवेळी त्यांना उमेदवारी न देता मगोने गोपाळ मयेकर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी राणे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. पण त्यावेळी त्यांना केवळ 92 मते मिळाली.
आतापर्यंत अन्य महिला उमेदवारांनी लोकसभेची निवडणूक लढविली त्यात 1971 साली दक्षिण गोव्यातून इरेन बारुश (अपक्ष 1246 मते), 1998 च्या निवडणुकीत दक्षिण गोव्यातून अनुपमा नाईक (अपक्ष 540 मते), 1999 च्या निवडणुकीत उत्तर गोव्यातून श्वेता आखाडकर (गोवा विकास पार्टी 1,407 मते), 2004 च्या निवडणुकीत दक्षिण गोव्यातून आवदा व्हिएगस (मगो 5,881 मते), 2009 च्या निवडणुकीत दक्षिण गोव्यातून स्मिता साळुंके (अपक्ष 1781 मते) तर 2014 च्या निवडणुकीत दक्षिण गोव्यातून स्वाती केरकर (आप 11,246 मते) व व्हिनस हबीब (अपक्ष 790 मते) यांचा समावेश आहे.
महिला कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियाप्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्ष महिलांचा प्रचारासाठी वापर करुन घेतात. मात्र त्यांना उमेदवारी देण्यासाठी कुठलाही पक्ष पुढे येत नाही. त्यामुळे आता महिलांनीच पुढाकार घेऊन आपला स्वत:चा पक्ष स्थापन करुन निवडणूक लढवण्याची गरज निर्माण झाली आहे. गोव्याचा शिक्षित मतदार या महिलांना किती पाठिंबा देतो ते आजमावून पाहण्याची गरज आहे.आवदा व्हिएगस, महिला चळवळीतील आघाडीच्या कार्यकर्त्या
या निवडणुकीत महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांचे नाव शेवटपर्यंयत उमेदवाराच्या शर्यतीत होते. गोव्याच्या महिला काँग्रेसने केलेल्या कार्याची ती पावती होती. मात्र शेवटी काही कारणांमुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही. असे जरी असले तरी राजकारणात महिलांना त्यांचे योग्य स्थान केवळ काँग्रेस पक्षच देऊ शकतो. काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास राजकीय क्षेत्रात महिलांना 33 टक्के आरक्षण निश्चितच मार्गी लावेल अशी अपेक्षा आहे.बीना नाईक, गोवा महिला काँग्रेस उपाध्यक्ष