नवी दिल्ली: माजी पंतप्रधानराजीव गांधींबद्दलच्या विधानावरुन काँग्रेसनंपंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. यावर भाष्य करताना आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. राजीव गांधींबद्दल मी केवळ तथ्य सांगितलं. त्यावरुन इतकं आकांडतांडव कशासाठी, असा सवाल मोदींनी काँग्रेसला विचारला. ते 'नवभारत टाईम्स'शी बोलत होते. उत्तर प्रदेशात शनिवारी (4 मे) एका जनसभेला संबोधित करताना मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली होती. त्यावेळी मोदींनी राजीव गांधींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यांनी राजीव गांधींना भ्रष्टाचारी नंबर वन असं म्हटलं होतं. याबद्दल मोदींना मुलाखतीत प्रश्न विचारला. त्यावर मी केवळ तथ्य सांगितलं, असं उत्तर मोदींनी दिलं. 'मी केवळ माहिती दिली. मात्र त्यावरुन संपूर्ण काँग्रेस पक्षाला इतका राग का आला, ते मला समजत नाही. जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष एका विद्यमान पंतप्रधानाला शिव्या देतात, त्याच्या कुटुंबाची, गरिबीची टिंगल करतात, तेव्हा हाच काँग्रेस पक्ष टाळ्या वाजवत असतो,' अशा शब्दांमध्ये मोदींनी अप्रत्यक्षपणे 'चौकीदार चोर है'वर भाष्य केलं. काँग्रेस अध्यक्ष विद्यमान पंतप्रधानावर टीका करतात. मात्र त्यांच्या वडिलांबद्दल काही तथ्य सांगितल्यास त्यांचा संपूर्ण पक्ष संतापतो, असं मोदी म्हणाले. 'विशेष म्हणजे काँग्रेस पक्षातल्या कोणीही राजीव गांधी भ्रष्ट नव्हते किंवा मी चुकीचं तथ्य सांगितलं असं म्हटलेलं नाही. काँग्रेसनं दिल्लीत राजीव गांधींच्या नावावर निवडणूक लढवावी, असं आव्हान मी आधीही काँग्रेसला दिलं होतं आणि आता त्याचा पुनरुच्चार करतो,' अशा शब्दांमध्ये मोदी काँग्रेसवर बरसले. उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढमध्ये शनिवारी झालेल्या रॅलीत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना लक्ष्य करताना त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधींवरदेखील टीका केली. 'तुमच्या (राहुल गांधींच्या) वडिलांना त्यांच्या राजदरबारातील लोकांनी मोठा गाजावाजा करत मिस्टर क्लीन म्हटलं होतं. मात्र हळूहळू भ्रष्टाचारी नंबर वनच्या रुपात त्यांचं आयुष्य संपलं. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुकीला क्षमा करतो. मात्र फसवणूक करणाऱ्याला कधीही माफ करत नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी राजीव गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली होती. मोदींच्या या टीकेला राहुल यांनी उत्तर दिलं होतं. 'मोदीजी, लढाई संपली आहे. तुमची कर्म तुमची वाट पाहत आहेत. माझ्या वडिलांवर आरोप करुन तुम्ही वाचू शकणार नाही,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
विद्यमान पंतप्रधानांना शिव्या देणारे राजीव गांधींबद्दल बोलताच संतापतात- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 11:00 AM