पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचा विकास झाला म्हणता मग गुजराती माणसं महाराष्ट्रात का येतात, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उपस्थित केला. मोदींनी 2014 मध्ये देशाला गुजरात मॉडेल दाखवलं. गुजरातमधला विकास दाखवला. गुजरातचा इतकाच विकास झाला असेल, तर मग तिथली असंख्य गुजराती माणसं मुंबईत कशासाठी येतात?, असा प्रश्न राज यांनी विचारला. ते पुण्यातल्या सभेत बोलत होते. देशानं अनेक पंतप्रधान पाहिले. मात्र बाहेरच्या देशातील पंतप्रधानांना, अध्यक्षांना स्वत:च्या राज्यात नेणारा पंतप्रधान देशानं पहिल्यांदा पाहिला, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे पंतप्रधान मोदींवर बरसले. भारतभेटीवर आलेल्या प्रत्येक अध्यक्षांना, पंतप्रधानांना मोदी फक्त आणि फक्त गुजरातमध्ये का नेतात, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडूत का नेत नाहीत, असे प्रश्न राज यांनी विचारले. मोदी जगभर फिरले. इतक्या देशांना भेटी दिल्या. त्यातून किती गुंतवणूक आणली, याची आकडेवारी त्यांनी द्यावी, असं आव्हान राज यांनी दिलं.गुजरातचा विकास आणि बुलेट ट्रेनवरुनदेखील राज ठाकरेंनी मोदींवर शरसंधान साधलं. यावेळी राज यांनी मोदींचा एक व्हिडीओदेखील दाखवला. 'मुंबई आर्थिक राजधानी आहे. गुजरात व्यापार केंद्र आहे. त्यामुळे इथून व्यवसाय जाणार असेल तर तो गुजरातला जाईल. पुण्याला जाणार नाही. कारण लक्ष्मी आणि सरस्वती वेगळ्या आहेत,' असं त्या व्हिडीओत मोदी म्हणाले होते. यावर बोलताना मराठी माणसानं त्या बुलेट ट्रेनचं करायचं काय, मराठी माणसाला बुलेट ट्रेनचा काय उपयोग, असे प्रश्न राज यांनी विचारले.मोदी गुजरातचा विकास केल्याचा दावा करतात. मग गुजरातमधील असंख्य माणसं मुंबईत का येतात, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात उद्योग संस्कृती रुजली आहे. इथलं वातावरण त्यासाठी अनुकूल आहे, असा विश्वास गुजराती माणसांना वाटतो म्हणून ते इथे येतात, असं म्हणत राज यांनी मोदींच्या गुजरातच्या मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
जर गुजरातचा विकास झालाय, तर असंख्य गुजराती महाराष्ट्रात का येतात?- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 9:26 PM