जळगाव : पुन्हा जर भाजपा-सेनेचे सरकार सत्तेवर आले, तर सन २०२४ ची निवडणूक होणार नाही. या देशात हुकूमशाही सुरू होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाप्रमाणे या देशाचे मालक बनवले आहे. चौकीदार नाही. तसेच ओबीसींचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत आणा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले. जळगाव जामोद येथे आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. काहीही कारण नसताना माझ्यासह अनेकांना तुरूंगात डांबणाऱ्या भाजपा सेनेला आपण मतदान करणार काय? असा भावनिक सवालही छगन भुजबळ यांनी केला. नरेंद्र मोदी यांनी सन २०१४ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. परिणामी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या झाल्या. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव दिला नाही, अशी टीका भुजबळांनी केली.शरद पवार हे कृषीमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. नोटाबंदीने देशातील १ कोटी छोटे उद्योग बंद पडले. मेक इन इंडिया तर दूरच उलट लढाऊ विमानांचा मोठा राफेल घोटाळा या सरकारने केला. गत पाच वर्षात कायदा व सुव्यवस्था धुळीला मिळाली आहे. दिवाळे निघालेल्या अनिल अंबानीला ९ हजार कोटीचे काम देण्यात आले म्हणजेच हे सरकार धनिकांचे आहे. गोरगरीबांचे नाही. महाराष्ट्र सदनाच्या ठेकेदाराला एक रूपयाही आजपर्यंत मिळाला नाही. मग मी त्यामध्ये ८५० कोटींचा भ्रष्टाचार केला हे म्हणणे म्हणजे चक्क शासनाचा खोटारडेपणा आहे. अशा भाजप-सेनेच्या सरकारच्या सत्ता देऊ नका नाहीतर देशाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही, असेही छगन भुजबळ म्हणाले.
देशात हुकूमशाही नको असेल, तर मोदींना सत्तेपासून दूर ठेवा- भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 11:13 PM