सर्व चोरांचं आडनाव मोदीच कसं?; राहुल गांधींच्या विधानाविरोधात लवकरच अब्रू नुकसानीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 05:37 PM2019-04-16T17:37:47+5:302019-04-16T17:40:02+5:30
बिहारचे मुख्यमंत्री दाखल करणार अब्रू नुकसानीचा दावा
पाटणा: भाजपाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी लवकरच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. सर्व चोरांचं आडनाव मोदीच कसं काय असतं, असा सवाल राहुल यांनी एका सभेत विचारला होता. राहुल यांच्या विधानावर सुशील कुमार मोदींनी तीव्र आक्षेप घेतला.
'मोदी आडनावाच्या सर्व व्यक्तींना चोर म्हणणाऱ्या राहुल यांच्या विधानावर मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे,' असं सुशील कुमार मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यंदा पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ 2014 पेक्षाही मोठी लाट असल्याचा दावा त्यांनी केला. यामुळेच महामिलावटी गठबंधनचे नेते पराभवाचं खापर फोडण्यासाठी ईव्हीएमचा मुद्दा पुढे करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
Will file defamation suit against @RahulGandhi for calling all Modi’s surname CHOR.
— Chowkidar Sushil Kumar Modi (@SushilModi) April 15, 2019
ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान होत असल्यानं खोटारडेपणा करण्यास वाव राहिला नाही, असं मोदी म्हणाले. 'मतपत्रिकेवरील मतदान बंद झाल्यानं काहींना खूप त्रास होतो आहे. ज्यांनी मतदान केंद्र लुटून बिहारमध्ये 15 वर्षे राज्य केलं, त्यांना मतपत्रिका हवी आहे. मात्र अशा केवळ पक्षांना वाटतं म्हणून जग मतपत्रिका, बैलगाडी आणि लालटेनच्या (राजदचं निवडणूक चिन्ह) काळात जाणार नाही. जेव्हा काँग्रेसनं तीन राज्यांमध्ये विजय मिळवला, तेव्हा ही मंडळी ईव्हीएमबद्दल गप्प होती,' असं मोदींनी म्हटलं .