सोलापूर: भाजपाच्या तथाकथित डिजिटल गावाचं खरं रुप दाखवत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सरकारच्या दाव्याची चिरफाड केली. भाजपानं हरिसाल गाव डिजिटल झाल्याचा दावा केला होता. मात्र तो धादांत खोटा आहे, असं म्हणत राज यांनी हरिसाल गावाची सद्यस्थिती व्हिडीओसह उपस्थितांना दाखवली. यावेळी तथाकथित डिजिटल गावातील एका तरुणाला थेट मंचावर आणलं. भाजपानं अमरावतीमधल्या हरिसाल गावाची जाहिरात केली होती. त्यामध्ये हरिसाल गाव डिजिटल झाल्याचं चित्र दाखवण्यात आलं होतं. गावात इंटरनेट असल्याचं, दुकानांवर डिजिटल पेमेंट होत असल्याचं भाजपानं जाहिरातीत दाखवलं होतं. मात्र हरिसाल गावातली खरी परिस्थिती वेगळीच असल्याचं मनसेनं दाखवलं. हरिसाल गावातल्या तरुणाला यावेळी राज यांनी मंचावर आणलं. 'हरिसाल गावाच्या जाहिरातीत दिसलेला हा तरुण सध्या सगळीकडे नोकरीसाठी भटकतोय. काही मनसे कार्यकर्त्यांना पुण्यात हा तरुण भेटला आणि त्यानंतर तो माझ्या संपर्कात आला,' असं राज यांनी सांगितलं. हरिसाल गावातील दुकानात डिजिटल पेमेंट होत असल्याचं भाजपानं जाहिरातीत दाखवलं होतं. मात्र प्रत्यक्षात त्या दुकानात कोणतंही कार्ड स्वाईप मशीन नाही. याशिवाय कोणी पेटीएमदेखील वापरत नसल्याचं या तरुणानं मनसेनं चित्रीत केलेल्या व्हिडीओत सांगितलं. हरिसालला डिजिटल व्हिलेज म्हणून दाखवणारी भाजपाची जाहिरात ही प्रत्यक्ष जाऊन चित्रीत करण्यात आली नाही. तर ती दुसरीकडेच चित्रीत करण्यात आली, असंदेखील राज ठाकरेंनी सांगितलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हरिसालबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी हरिसाल हे डिजिटल व्हिलेज असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं. राज ठाकरे हरिसालला गेलेलेच नाहीत. तुम्ही तुमच्या लोकांना पाठवून तिथली परिस्थिती बघा, असंदेखील फडणवीस म्हणाले होते. मात्र त्या वृत्तवाहिनीलादेखील हरिसालमध्ये काहीच डिजिटल दिसलं नाही. यावरुनही राज यांनी मुख्यमंत्र्यावर सडकून टीका केली. 'राज ठाकरे हरिसालला गेलेच नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले. मग ते म्हणाले होते मी महाराष्ट्रात १ लाख वीस हजार विहिरी बांधल्या. कुठल्या विहिरीवर तुम्ही पाणी काढायला गेला होतात?', असा सवाल राज यांनी विचारला.
भाजपाची पोलखोल! तथाकथित डिजिटल गावातला 'तो' तरुण राज ठाकरेंच्या मंचावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 9:01 PM