नांदेड: क्रांतीकारक भगतसिंह तुरुंगात असताना त्यांना भेटायला काँग्रेसचा एकही नेता गेला नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका सभेत केला होता. मोदींचा हा धोटा पूर्णपणे खोटा असल्याचं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधानांचा समाचार घेतला. मूळ मुद्द्यांना बगल देण्यासाठी मोदी कोणतेही विषय उकरून काढतात. 2014 मध्ये दिलेल्या आश्वासनांवर, दाखवलेल्या स्वप्नांवर मोदी का बोलत नाहीत, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. ते नांदेडमध्ये बोलत होते. पंतप्रधान मोदींचं गेल्या वर्षातील एका भाषणाचा काही भाग राज ठाकरेंनी सभेत दाखवला. त्यात मोदींनी क्रांतीकारक भगतसिंहांना तुरुंगात भेटण्यासाठी काँग्रेस परिवारातील एकही नेता गेला नाही, अशी टीका केली होती. यावर बोलताना मोदी देशाला चुकीचा इतिहास सांगत असल्याचं राज म्हणाले. काँग्रेस परिवारातील एकही नेता गेला नाही, म्हणजे नेमकं कोण गेलं नाही? जवाहरलाल नेहरु गेले नाहीत, सरोजिनी नायडू गेल्या नाहीत की सरदार वल्लभभाई पटेल गेले नाहीत? मोदींना नेमकं म्हणायचंय का? असे प्रश्न मोदींनी उपस्थित केले.पंतप्रधान मोदी आता बोललेच आहेत, तर त्यावेळची एक बातमी तुम्हाला दाखवतो, असं म्हणत राज यांनी 'द ट्रिब्युन' दैनिकात प्रसिद्ध झालेली एक बातमी दाखवली. भगतसिंह तुरुंगात असताना दोनवेळा त्यांची भेट घेणारे नेहरु हे देशातील एकमेव नेते होते, असं राज बातमी दाखवून म्हणाले. नेहरु दोनदा भगतसिंहांना तुरुंगात भेटायला गेले होते. ऑगस्ट 1929 मध्ये ही बातमी वर्तमानपत्रात छापून आली. त्यावेळी इंदिरा गांधी फक्त 14 वर्षांच्या होत्या. त्यामुळे संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधींचा तर प्रश्नच येत नाही, असं म्हणत राज यांनी मोदी सर्रास खोटं बोलत असल्याचा आरोप केला.
भगतसिंगांबद्दल मोदींनी केलेला 'तो' दावा धादांत खोटा- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 9:43 PM