मुंबई: नरेंद्र मोदींनी काल पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. मात्र त्यांनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. मोदींना विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांना भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी उत्तरं दिली. यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे. आमचा पंतप्रधान पत्रकारांना सामोरा जायला घाबरतो, अशी टीका महिन्याभरापूर्वी करणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंनीदेखील मोदींवर नेमक्या शब्दांत शरसंधान साधलं.'पंतप्रधानांची पत्रकार परिषद... ‘मौन की बात’!', असं ट्विट करत राज ठाकरेंनी मोदींना टोला लगावला. काल मोदींनी अमित शहांसह पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहांनी मोदी सरकारच्या योजनांची माहिती दिली. यानंतर मोदींनी पत्रकारांना संबोधण्यास सुरुवात केली. सरकारचे प्रमुख म्हणून मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देतील, असा कयास होता. मात्र त्यांनी एकाही प्रश्चाला उत्तर दिलं नाही.पंतप्रधान मोदी पत्रकार परिषदेला उपस्थित करताना सर्वच प्रश्नांची उत्तरं शहांनी दिली. पंतप्रधानांना विचारण्यात आलेला एक प्रश्न त्यांनी मोठ्या खुबीनं शहांकडे टोलवला. 'मी पक्षाचा शिस्तप्रिय सैनिक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पक्षाचे अध्यक्ष म्हणून शहाच देतील,' असं मोदी म्हणाले. त्यानंतर पुन्हा एकदा एका पत्रकारानं एका प्रश्नावर मोदींची प्रतिक्रिया विचारली. त्यावर प्रत्येक प्रश्नाला पंतप्रधानांनी उत्तरं देण्याची आवश्यकता नाही, असं म्हणत शहांनी त्या प्रश्नाचं उत्तरदेखील स्वत:च दिलं. राज ठाकरेंनी त्यांच्या 16 एप्रिलला इचलकरंजीत झालेल्या सभेत मोदींनी न घेतलेल्या पत्रकार परिषदेचा मुद्दा उपस्थित केला होता. आमचा पंतप्रधान पत्रकारांना घाबरतो. त्यामुळेच गेल्या पाच वर्षांत मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, अशा शब्दांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पंतप्रधानांवर शरसंधान साधलं होतं. प्रसारमाध्यमांना एकदाही सामोरं न गेलेले नरेंद्र मोदी हे या देशाच्या इतिहासातील एकमेव पंतप्रधान आहेत, अशी टीका राज यांनी केली होती. 2014 मध्ये लोकांना अच्छे दिनचं स्वप्न दाखवणारे, आश्वासनं देणारे मोदी आज कशालाच बांधील नाहीत. मोदी जनतेच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत. गेल्या निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांवलर बोलत नाही, असंदेखील राज ठाकरे म्हणाले होते.