अहमदनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहून मत द्या, असं म्हणून मतदान करण्याचं आवाहन करणाऱ्या भाजपा नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला आहे. सासऱ्याकडे बघून मुलगी दिली जात नाही, मग मोदींकडे पाहून भाजपाला मतं कशी द्यायची, असा सवाल उपस्थित करत पवारांनी चिमटा काढला. ते अहमदनगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारसभेत बोलत होते. 'उद्या जर मुलगी द्यायची असेल, तर सासऱ्याकडे पाहून मुलगी दिली जाते का? आपण आधी मुलगा कसा आहे ते बघतो. तो काम करणारा आहे का, निर्व्यसनी आहे की नाही ते बघतो. त्यानंतर मुलीला तुला हे स्थळ पसंत आहे का ते विचारतो. यानंतर आपण मुलीचं लग्न ठरवतो. पण भाजपावाले सगळ्या भाषणांमध्ये मोदींकडे पाहून आम्हाला मतं द्या सांगत आहेत. स्वत: काय केलं ते सांगायचं नाही. उमेदवार कसा आहे ते बघायचं नाही. फक्त मोदींकडे पाहून मतं मागायची भाजपा नेत्यांना सवय झाली आहे,' अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी भाजपाला टोला लगावला.गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. मोदींनी पवार कुटुंबात सारंकाही आलबेल नसल्याचं म्हणत हल्लाबोल केला होता. त्याला मोदी एकटेच राहत असल्यानं त्यांना कुटुंबाचं मोल कसं माहीत असेल, असं म्हणत पवारांनी प्रत्युत्तर दिलं. नको त्या गोष्टीत नाक खुपसू नका, असा इशारादेखील पवारांनी दिला होता. माझ्या घरात मुलगी, पत्नी, नातेवाईक आहेत. आमचं मोदींसारखं नाही. त्यांच्या घरात कोणीच नाही. त्यामुळे त्यांना कुटुंब चालवण्याचा अनुभव नाही,' असं पवार म्हणाले होते.
सासऱ्याकडे पाहून मुलगी दिली जात नाही; मग मोदींकडे बघून भाजपाला मतं कशी द्यायची?- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 17:08 IST