'या' राज्यानं 30 वर्षांपासून निवडून दिला नाही मुस्लिम खासदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 03:14 PM2019-04-05T15:14:31+5:302019-04-05T15:15:55+5:30

तीन दशकं मुस्लिम खासदार न पाहिलेलं राज्य

Lok sabha election No Muslim Mp From Gujarat In Lok sabha From last 30 Years | 'या' राज्यानं 30 वर्षांपासून निवडून दिला नाही मुस्लिम खासदार

'या' राज्यानं 30 वर्षांपासून निवडून दिला नाही मुस्लिम खासदार

googlenewsNext

अहमदाबाद: गेल्या 30 वर्षांपासून गुजरातनं एकही मुस्लिम खासदार निवडून दिलेला नाही. जवळपास 10 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या गुजरातमध्ये यंदाही याचीच पुनरावृत्ती होणार का, याचं उत्तर 23 मे रोजी मिळेल. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार असलेले अहमद पटेल 1984 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. मात्र 1989 मध्ये भाजपाच्या चंदू देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे 1989 पासून गुजरातनं मुस्लिम खासदार पाहिलेला नाही. 

गुजरातमध्ये सध्या 9.5 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीचा इतिहास लक्षात घेतल्यास, 1962 मध्ये बनासकांठामधून जोहरा चावडा निवडून आल्या होत्या. त्यानंतर 1977 मध्ये दोन मुस्लिम उमेदवार निवडून आले. अहमद पटेल (भरुच) आणि एहसान जाफरी (अहमदाबाद) अशा दोन उमेदवारांवर जनतेनं विश्वास दाखवला. एकाच निवडणुकीत दोन मुस्लिम खासदार निवडून देण्याची गुजरातची ही पहिली आणि शेवटची वेळ होती. 

गुजरात भाजपासाठी हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे. या राज्यात भाजपानं कधीही मुस्लिम उमेदवार दिला नाही. काँग्रेसनं 2014 पर्यंत राज्यात 15 मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले. यावेळी काँग्रेसनं फक्त भरुचमधून मुस्लिम उमेदवार दिला आहे. भरुच मतदारसंघात मुस्लिमांचं प्राबल्य आहे. या मतदारसंघात 15.64 लाख मतदार आहेत. यातील 22 टक्के मतदार मुस्लिम आहेत. तर अहमदाबाद पश्चिममध्ये 25 टक्के मुस्लिम मतदार आहेत. गांधीनगरमधील जुहापुरामध्येदेखील मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. यंदा गांधीनगरमधून भाजपाचे अध्यक्ष अमित शहा निवडणूक लढवत आहेत. 

 

Web Title: Lok sabha election No Muslim Mp From Gujarat In Lok sabha From last 30 Years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.