पाथरी (जि. परभणी) :पाकिस्तानचे एफ-१६ हे विमान पाडले असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. तर अमेरिकेने असे कोणतेही विमान पाडले नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खोटे बोलण्याचा हा नवा जुमला आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केले. परभणी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांच्या प्रचारार्थ रविवारी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचे पाथरीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. भारतीय हवाई दलानं एअरस्ट्राईक केला, याबाबत दुमत नाही. पाकिस्तानचे एफ-१६ हे विमान पाडल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. परंतु, अमेरिकेने मात्र असे कोणतेही विमान पाडले नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा खोटे बोलण्याचा हा नवा जुमला होता, असे आंबेडकर म्हणाले. शेतकऱ्यांना हमीभाव, बेरोजगारी, सामाजिक स्वास्थ्य यावर निवडणुकीत चर्चा होत नाही. ओबीसी, मराठा यांच्यातील भांडणे मिटविण्याची चर्चा होत नाही. तर संपूर्ण निवडणूक चोर आणि चौकीदार यावरच होत आहे, ही खेदाची बाब आहे, असेही त्यांनी म्हटले. यावेळी व्यासपीठावर उमेदवार आलमगीर खान, गणपत भिसे, मंचक हारकळ, धर्मराज चव्हाण, किशन चव्हाण, दिलीप मोरे, अॅड.पोटभरे, दशरथ शिंदे, प्रकाश उजगरे, मधुकर काळे आदींची उपस्थिती होती.
पाकिस्तानचं एफ-16 पाडलं हा मोदींचा नवा जुमला- आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 9:23 PM