50 प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर बुक करत भाजपाची प्रचारात आघाडी; काँग्रेसवर कुरघोडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 07:47 PM2019-04-16T19:47:58+5:302019-04-16T19:50:42+5:30
भाजपाचं तीन महिने आधीच बुकिंग
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. देशातील 90 कोटी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस, भाजपानं कंबर कसली आहे. यामध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपानं आघाडी घेतली आहे. ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार, भाजपानं प्रचारासाठी 50 प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर बुक केली आहेत. काँग्रेसवर कुरघोडी करण्यासाठी तीन महिने आधीच भाजपानं हे बुकिंग केलं.
निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात असल्यानं नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. लांबचं अंतर कापण्यासाठी नेतेमंडळी प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टरला पसंती देतात. मात्र सध्याची मागणी पूर्ण करू शकतील, इतकी प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर देशात नाहीत. भाजपानं निवडणुकीसाठी 20 प्रायव्हेट जेट आणि 30 हेलिकॉप्टर बुक केली आहेत. तर काँग्रेसला केवळ 10 प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर बुक करता आली आहेत.
सार्वत्रिक निवडणुकीत विरोधकांचं प्रचार अभियान अपयशी करण्यासाठी, त्यांच्या सभांची प्रयत्न केले जात असल्याचं बिझनेस एअरक्राफ्ट ऑपरेटर असोसिएशनचे सल्लागार आणि मार्टिन कन्सल्टिंगचे संस्थापक मार्क मार्टिन यांनी सांगितलं. मात्र यंदा प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर बुक करण्यासाठी दिसत असलेली स्पर्धा याआधी कधीही पाहायला मिळाली नव्हती, असं ते म्हणाले. एका पक्षाच्या प्रचार अभियानाला धक्का देण्यासाठी दुसऱ्या पक्षानं प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर बुक केले. प्रायव्हेट जेट्स 45 दिवसांसाठी बुक करण्यात आली आहेत. एका प्रायव्हेट जेटचं भाडं 5700 डॉलर (जवळपास 4 लाख रुपये) आहे. तर हेलिकॉप्टरचं भाडं 7200 डॉलर (जवळपास 5 लाख रुपये) इतकं आहे.